कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या कोव्हीड १९ या आजारावर मात करत पवईतील १० बाधित आता घरी परतले आहेत. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुढील १४ दिवसांसाठी ते घरीच अलगीकरणात असणार आहेत. ही एक मोठी दिलासादायक बातमी पवईकरांसाठी आहे.
महाराष्ट्र राज्यासह मुंबई आणि पवईतही कोरोनाने थैमान मांडले आहे. मंगळवार २८ एप्रिल पर्यंत या कोरोनाच्या संसर्गाने पवईतील २७ लोकांना आपल्या कवेत घेत बाधित केले आहे. यातील एकाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे या विषाणूंशी लढा देत यांच्यावर मात करत पवई परिसरातील १० बाधितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांची तब्येत बरी झाल्याने आता त्यांना घरी सोडण्यात आले असून, पुढील काळात १४ दिवसांसाठी ते घरात अलगीकरणात असणार आहेत.
बाधित रुग्ण परतलेले परिसर
हिरानंदानी येथील बाधित ४४ वर्षीय महिलेला घरी सोडण्यात आले असून, तिचे अलगीकरण संपुष्टात येताच या परिसरातील सिल हटवण्यात आले आहे. आयआयटी पवई येथील तिरंदाज शाळेजवळील रहिवाशी इमारत भागात मिळून आलेल्या ३४ वर्षीय व्यावसायिकाला सुद्धा त्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच घरी सोडण्यात आले आहे.
चैतन्यनगर येथील २ कुटुंबातील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने १३ एप्रिल (१ पुरुष), १४ एप्रिल (१ महिला) आणि १६ एप्रिल (दांम्पत्य) रोजी त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यानंतर १२ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह मिळून आलेल्या तिरंदाज शाळेजवळील वस्तीत राहणाऱ्या ३७ वर्षीय इसमास सुद्धा अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे.
१९ एप्रिलला बाधित असल्याचा अहवाल आलेल्या आणि आयआयटी स्टाफ कॉर्टर्स येथे राहणाऱ्या फोटो-जर्नालिस्टला सुद्धा रविवारी २६ एप्रिलला घरी सोडण्यात आले आहे. यासोबतच रुग्णालयात उपचार घेत असताना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या गौतमनगर, आरे कॉलोनी रोड येथील १९ वर्षीय तरुणीला आणि पासपोली व्हिलेज, नीटी येथे २१ एप्रिल रोजी बाधित मिळून आलेल्या २३ वर्षीय तरुणीला सुद्धा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त आयआयटी मेनगेट गोखलेनगर येथील ३० वर्षीय पुरुष आणि आयआयटी फुलेनगर येथील वीस वर्षीय तरुणी यांचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
Nice
आवर्तन पवई कडून चांगली माहिती मिळत आहे. धन्यवाद !
धन्यवाद…
तुमच्या सारख्या मार्गदर्शक आणि वाचकांच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देतात.