जोगेश्वरीमध्ये एसआरएअंतर्गत स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून २४ लाख रुपयांना ठगणाऱ्या एका भामट्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शिवलिंग कोळे असे या अटक आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार मोहमद आमीर हे आपल्या परिवारासोबत साकीनाका परिसरात राहतात. मुंबईत हायवेजवळ एखादे स्वस्तातील घर मिळावे म्हणून ते आणि त्यांचा भाऊ प्रयत्न करत होते. मात्र हायवेजवळील घरांच्या किमती जास्त असल्याने त्यांना हे शक्य होत नव्हते.
“घराच्या प्रयत्नात असतानाच ओळखीच्या असणाऱ्या व घराच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करणारा शिवलिंग जवळ त्यांनी आपली ही इच्छा बोलून दाखवली. जोगेश्वरी येथील ओशिवरा राममंदिर रोडवर एका एसआरए प्रोजेक्टचे काम सुरु असून, तेथे तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देतो असे शिवलिंग याने त्यांना सांगितले होते.” असे याबाबत बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
स्वस्तात घर मिळत असल्याने आमीर आणि त्यांच्या भावाने २४ लाख रुपये देवून घराचे अग्रीमेंट सुद्धा तयार केले. दोन वर्षात घराचा ताबा मिळेल असे शिवलिंग याने सांगितल्याने ते प्रोजेक्ट पूर्ण होण्याची वाट बघत होते. मात्र चार – पाच वर्ष उलटून सुद्धा घराचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता, अग्रीमेंटमध्ये दाखवलेले घर हे भलत्याच व्यक्तीला विकले असल्याचे समजले. त्यांना दिलेल्या घराची कागदपत्रे सुद्धा खोटी असल्याचे समोर येताच त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
No comments yet.