अंधेरी पोलिसांनी सहा तासात शोधला हरवलेल्या मुलाचा परिवार

नेपाळ येथून आपल्या काकासोबत मायानगरीत आलेल्या तेरा वर्षीय मुलाची काकांशी झालेल्या चुकामुकीनंतर घाबरलेल्या मुलाला सांभाळत सहा तासाच्या आत परिवाराचे परत मिलन करून देण्याचे काम अंधेरी पोलिसांनी करून दाखवले आहे. राहुल थापा (१३) असे हरवलेल्या मुलाचे नाव असून सोशल मीडियाची कमाल पुन्हा एकदा दिसून आली आहे. अंधेरी पोलिसांवर त्यांच्या या कामाबद्दल प्रशंसेचा वर्षाव होत आहे.

मुळचा नेपाळ येथील असणारा सुमित जितबहादुर थापा हा आपला पुतण्या राहुल थापा याला मुंबईला फिरवण्यासाठी घेवून आला होता. दोघे अंधेरी येथे असताना रात्रीच्या अंधारात दोघांच्यात चुकामुक कशी आणि कधी झाली दोघांनाही कळले नाही. आपले काका आपल्या सोबत नाहीत याची जाण झालेला, भेदरलेला राहुल इकडे तिकडे कोणाला तरी शोधत असल्याचे पाहून एक रिक्षावाल्याने त्याला विचारले असता त्याने आपण हरवले असल्याचे सांगितले.

रिक्षावाल्याने त्वरित त्याला अंधेरी पोलीस स्टेशनच्या हवाले करत याबाबत माहिती दिली.

“आम्ही त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली असता तो, अर्जुन चौपाटी, जिल्हा शयांजा नेपाळ येथून असून, त्याचे नाव राहुल थापा आहे आणि चुकामुक होवून तो हरवला आहे या व्यतिरिक्त त्याला काहीच माहित नव्हते” असे यावेळी बोलताना अंधेरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

यावेळी कर्तव्यावर असणारे ठाणे अंमलदार पोलिस उप निरीक्षक विकास कदम, बाबाजी जाधव, शांताराम मेने, सचिन सोनमाळी, व मास्तर जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात आणि पोलीस निरीक्षक गरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलला घरी परतवण्याच्या मिशनला सुरुवात केली.

राहुलचे फोटो फेसबुक, व्हॅटसअॅप या सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केले. परिसरात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांची माहिती मिळवत त्यांच्याकडे राहुलच्या काकाबद्दल किंवा परिवाराबद्दल काही माहिती मिळवण्यात आली. अखेर त्याचा काका सुमित थापा याचा मोबाईल नंबर मिळवत त्यांचा पुतण्या सुखरूप असल्याचे सांगत सुमित, राहुल आणि परिवाराची सहा तासात पुन्हा भेट घडवून आणली.

या कौतुकास्पद तत्पर कामगिरीसाठी पो.उप.नि कदम व त्यांच्या सहकाऱ्यांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!