ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत; बाजी कोण मारणार?

संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात कोण बाजी मारणार? संजय दीना पाटील कि मनोज कोटक?

देशभर निवडणुकांचे वारे वाहत आहे. मुंबईत सहा मतदार संघात लढाई आहे, मात्र कॉलेज कट्ट्यापासून चहाच्या स्टॉलपर्यंत जिकडे – तिकडे एकच चर्चा आहे, ईशान्य मुंबई मतदारसंघात कोण बाजी मारणार? कारण ही तसेच आहे. महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीत मातोश्रीवर आरोप करणारे किरीट सोमैय्या यांना उमेदवारी मिळू नये म्हणून शिवसैनिकांनी जबरदस्त मोर्चेबांधणी केली होती. आमदार सुनील राऊत यांनी सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास सरळ अपक्ष निवडणूक लढविणार अशी घोषणा केल्यामुळे भाजप – सेना युती असतानाही भाजपाला जागा मिळालेल्या या मतदार संघात भाजपा समोर उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला या सगळ्या ‘ऊलाढाली’ला अल्पविराम मिळाला आणि भाजपाचे महानगरपालिकेतील गटनेते मनोज कोटक यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर झाली.

भाजपमध्ये उमेदवारीचा गोंधळ सुरु असताना काँग्रेस – राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी वैयक्तिक भेटीगाठी, कार्यकर्ता मेळावे आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचाराची अनौपचारिक सुरुवात केली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या किरीट सोमैय्या यांना अस्मान दाखवले होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार शिशिर शिंदे ह्यांनी भरघोस मतदान घेऊन पाटील यांच्या विजयाला हातभार लावला होता हे विसरता येणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे स्वतः संजय दीना पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेणार असल्याने २००९ ची पुनरावृत्ती होणार की भाजपा आपली सीट कायम राखणार हे पाहणे औतुस्क्याचे ठरणार आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ६ पैकी ५ जागेवर युतीचे आमदार आहेत, तर शिवाजीनगर – मानखुर्द येथे सपाचे अबू आझमी आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही आमदार या मतदारसंघात नाही. मात्र असे असून सुद्धा भाजप – सेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारणे ही तशीच आहेत. भाजप – सेना युती अभेद्य दिसत असली तरी महानगरपालिका निवडणुकीत दुभंगलेली मने जोडण्याचे अवघड काम मनोज कोटक यांना करावे लागणार आहे. यातच दुसरीकडे सेनेशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे नाराज सैनिकांकडून संजय दिना पाटील यांना रसद पुरवली जाऊ शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या मतदारसंघात लक्ष्यणीय ताकद आहे, ही मते जर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडे वळली तर मनोज कोटकांना धक्का बसू शकतो. मात्र, नाराज सैनिकांना शांत करण्यासाठी कोटकांना मैदानात उतरवल्याने युतीचा उमेदवार म्हणून पाहिले असता ५ आमदारांच्या बळावर त्यांचे पारडे जड होवू शकते.

विधानसभा मतदारसंघनिहाय जर आपण थोडे विश्लेषण केले तर काय दिसते?

मुलुंड विधानसभा हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला आहे. गुजराती मतदारांची संख्या येथे लक्षणीय आहे. पाठीमागील दोन दशकांपेक्षाही जास्त कालावधीपासून हा भाजपाचा गड बनला आहे. आधीच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजप या मतदारसंघात खूप मजबूत दिसत आहे. भांडूप विधानसभा मतदारसंघातून नियमित वेगवेगळे निकाल आले आहेत. शिवसेनेचे वर्चस्व असलेला मतदारसंघ २००४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने बहुमताने जिंकला. २००९ साली मनसेने तो राष्ट्रवादीकडून ताकदीने खेचून नेला. २०१४ साली शिवसेनेने त्याला पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. इतक्या आश्चर्यकारक निकालामुळे यामतदारसंघात नेमके काय होईल हे सांगता येणे अवघड आहे. मनसे नेते शिशिर शिंदे सध्या शिवसेनेत आहेत आणि त्यामुळे युती भक्कम स्थितीत असल्याचा कयास बांधला जातोय.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ हा तसा नवीन आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ मध्ये तो बनला. मनसेचे मंगेश सांगळे येथून प्रथम आमदार झाले. २०१४ मध्ये शिवसेनेने सुनील राऊत यांच्या रुपात विजयश्री खेचून आणला. इथेही मंगेश सांगळे हे भाजपवासीय झाले आहेत. घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम येथे भाजपाचे प्राबल्य आहे. मोठ्या संख्येने असलेला गुजराती समाज आणि भाजपचे दिग्गज नेते प्रकाश मेहता यांचा या दोन्ही मतदारसंघावर तगडा प्रभाव आहे. घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. संघटनात्मक दृष्ट्या भाजप आणि सेना मजबूत असल्याने येथे मनोज कोटक निर्धास्त असणार आहेत.

मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघ हा मुस्लिम बहुल असल्यामुळे आणि २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना निर्णायक आघाडी याच मतदारसंघात मिळाली. २०१४ विधानसभा निवडणुकीत येथून सपाचे अबू आझमी आमदार झाले आहेत. समाजवादी पक्ष सध्या आघाडीमध्ये नसल्यामुळे हे मतदान कुठे वळते हे पाहणे महत्वाचे ठरेल. पण आजच्या घडीला तरी येथे आघाडीचे संजय दीना पाटील अग्रेसर राहतील असे दिसत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघात सामाजिक समीकरणे खूप निर्णायक ठरतात. मराठी मतदार साडेतीन लाखापेक्षा जास्त आहेत. दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या हि लक्ष्यणीय आहे. गुजराती भाषिक मतदार सुद्धामोठ्या प्रमाणात आहेत. मराठी मतदार हा शिवसेना आणि मनसेच्या पाठीशी उभा राहतो. संजय दिना पाटील यांना मनसेने पाठिंबा दर्शवल्याने यावेळची समीकरणे बदलू शकणारी आहेत.

प्रचारात जशी रंगत येईल तसा निर्णयाचा लंबक कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. तूर्तास मनोज कोटक आणि संजय दिना पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार हे निश्चित असून, ईशान्य मुंबई लोकसभा बाजी कोण मारणार हा प्रश्नच आहे.

..क्रमशः

– शेखर सोलापूरकर


लेखात व्यक्त मतांशी / विचारांशी ‘आवर्तन पवई’ किंवा ‘संपादक’ सहमत असतीलच असे नाही. हे लेखकाचे स्वतःचे मत आहे -वृत्तसंपादक

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!