हिरानंदानी येथील पवई प्लाझाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिओ सिंडीकेट या कन्सल्टन्सी ऑफिसला आज (सोमवार) सकाळी ११.३० वाजता भीषण आग लागली. आगीत कन्सल्टन्सी ऑफिस जळून पूर्ण खाक झाले असून, शेजारी असणाऱ्या दोन ऑफिसना सुद्धा याची झळ बसली आहे. इमारत प्रशासन, शॉप कर्मचाऱ्यांच्या मदतीने व घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमनदलाच्या ५ गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या घटनेमुळे अग्निशमन केंद्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीच्या वेळी अडसर ठरत असणाऱ्या अनेक दुकानांचे पुनर्वसन एमएमआरडीएच्यावतीने हिरानंदानीला लागून निर्माण करण्यात आलेल्या पवई प्लाझामध्ये करण्यात आले आहे. याच ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर शॉप क्रमांक ३५० मध्ये जिओ सिंडीकेट या कन्सल्टन्सी कंपनीचे कार्यालय आहे. सोमवारी सकाळी कार्यालय सुरु असताना येथे असणाऱ्या एसीमध्ये शोर्ट सर्किट होवून तिने आग पकडली. आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यापूर्वीच येथील कपाटातील कागद आणि फायलिनी पेट घेत आगीने संपूर्ण कार्यालयच आपल्या विळख्यात घेतले.
इमारतीत उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय आणि शॉप कर्मचाऱ्यांनी इमारतीत असणाऱ्या अग्निसुरक्षा यंत्रांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरवात करत आगीला पसरण्यापासून रोखून धरले. अखेर उशिरा पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
“एसीमधील शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी सोमनाथ जयभये यांनी सांगितले.
अग्निशमन केंद्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
यावेळी येथे उपस्थित इमारत व्यवस्थापन कर्मचारी आणि शॉप मालकांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले, अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी जवळपास अर्धा तास उशिरा पोहचल्या. इमारतीत असणाऱ्या अग्निसुरक्षा साधनांच्या मदतीने आम्ही वाढणाऱ्या आगीला थोपवून ठेवत आगीवर नियंत्रण मिळवले होते. अग्निशमन दल आले तेव्हा आग जवळपास विझलेलीच होती. अग्निसुरक्षा साधने उपलब्ध नसती आणि विक्रोळी आणि मरोळ फायर स्टेशनमधून येणाऱ्या अग्निशमन दलाची वाट पाहत बसले असते तर संपूर्ण इमारतच जळून खाक झाली असती.
“८ लाखाच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या पवईत आगीसारखी घटना घडल्यास विक्रोळी किंवा मरोळ फायर स्टेशनमधून गाड्या येतात. त्यांना रस्त्यात लागणारी वाहतूक कोंडी आणि छोट्या रस्त्यांचा सामना करायचा असल्याने त्या प्रत्येक वेळी उशीरच पोहचतात. जे पाहता पवईमध्ये अग्निशमन केंद्र बनवण्यात यावे अशी मागणी युथ पॉवर व धम्मदिप या आमच्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही गेली कित्येक वर्षा करत आहोत.” असे आवर्तन पवईशी बोलताना समाजसेवक रमेश कांबळे यांनी सांगितले.
“प्रशासन जाणूनबुजून आमच्या मागणीकडे कानाडोळा करत आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्या वर्षी लेकहोम येथे लागलेल्या आगीत वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आजही अग्निशमन दलाच्या गाड्या लांबून येत असल्याने उशीरच पोहचल्या. मात्र स्थानिकांनी पुढाकार घेत आगीवर नियंत्रण ठेवल्याने मोठी हानी टळली आहे. मात्र असे किती दिवस चालणार म्हणून आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून आमची हि मागणी ठेवणार आहोत.” असे युथ पॉवर संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र धिवार यांनी सांगितले.
No comments yet.