पार्कसाईट, विक्रोळी येथील कैलाश कॉम्पलेक्स भागातील उतारावर एका भरधाव टँकरने ६ जणांना उडवल्याची घटना (आज) शनिवारी रात्री उशिरा १०.१० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेतील जखमींना त्वरित घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, यातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात प्रत्यक्ष दर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानीकडून विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरच्या चालकाचा पार्कसाईट येथील कैलाश कॉम्प्लेक्स भागात असणाऱ्या उतारावर गाडीवरील ताबा सुटला. नियंत्रणा बाहेर झालेल्या टँकरने रस्त्यावर असणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडत धावायला सुरवात केली. यामध्ये रिक्षा, मोटर सायकल आणि पादचारी चिरडले गेले. प्रचंड आवाज करत तो टँकर उतारावर धावत होता.
आवाज ऐकून आसपासच्या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी धाव घेत जखमींना त्वरित रुग्णालयात हलवले आहे. घटनेत जखमींची संख्या नक्की समजली नसून, ६ जण गंभीर जखमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘दोघांना मृत आणले गेले आहे, तर एक लहान मुलाला गंभीर अवस्थेत आणले होते.’ – डॉ विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी रस्त्यावर जमा होत भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
शेवटची माहिती हाती आली तेव्हा पार्कसाईट पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, निष्काळजीपणे आणि हयगयीने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे अंतर्गत टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
No comments yet.