वैद्यकीय क्षेत्रामध्ये देशात आपले अढळ स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध ई एन टी स्पेशालिस्ट, सर्जन पद्मभूषण दिवंगत डॉ एल एच उपाख्य लखूमल हिरानंद हिरानंदानी यांचे नाव पवईतील, हिरानंदानी येथील हेरिटेज जवळील पालिका उद्यानाला देण्याची मागणी आई जिजाऊ बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.
थत्ता, सिंध येथे जन्मलेले डॉ हिरानंदानी यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावीच झाले. १९३७ मध्ये परिवारसह मुंबईला येऊन १९४२ साली त्यांनी मेडिसिनमध्ये पदवी घेतली. ज्यानंतर आपली इंटर्नशिप पूर्ण करून पुढील शिक्षण त्यांनी लंडन येथून घेतले आणि मुंबईत ईएनटी सर्जन म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक नावाजलेल्या रुग्णालयातून त्यांनी रुग्णांची सेवा केली. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या हिरानंदानी फौंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून २ शाळा सुद्धा चालवल्या जात आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना १९७२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटगीरी यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
पवई, हिरानंदानी परिसरातील महानगरपालिकेचे न.भु. क्र. २२/५ मौजे पवई हे उद्यानासाठी राखीव आहे. या ठिकाणी एक मोठे उद्यान सुद्धा बनवण्यात आले आहे, मात्र अद्याप त्याचे नामकरण करण्यात आले नसल्याने सदर उद्यानाला पद्मभूषण एल एच हिरानंदानी यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करावा अशी यामागची भावना असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा कविता चव्हाण यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाने शासनाने एखादी वैद्यकीय क्षेत्रातील योजना सुरू करायला हवी होती, पण तसे न होता, अशा व्यक्तीचे कार्य आजवर दुर्लक्षित राहिले आहे. दिवंगत डॉ एल एच हिरानंदानी यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून आपण ही मागणी केली असून, या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
No comments yet.