महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचा वाढता आकडा बघता वाढत्या प्रादुर्भावाला दुसऱ्या स्टेजवरच रोखण्यासोबतच सोशल डीस्टेन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवण्यासाठी पवई, चांदिवलीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठोस पाऊले उचलली आहेत. पालिका एस विभागातर्फे पवईतील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांसमोर सुरक्षित अंतरावर चौकोनी बॉक्स आणि रिंगण आखण्यात आले आहेत. या रिंगणात उभे राहिलेल्यांना सामान देण्यात यावे व सुरक्षित असे अंतर ठेऊन संसर्ग होण्यापासून थांबवावा अशा सूचना सुद्धा पालिकेने दुकानदारांना दिल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोविड-१९ आजाराचा कोरोना विषाणू ठराविक अंतरापर्यंतच हवेत राहून खाली पडतो. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी याची पूर्ण खबरदारी घेत पवईतील चैतन्यनगर, आयआयटी मार्केट, फिश मार्केट, गोखलेनगर, नीटी, आरे कॉलोनी रोड अशा ठिकाणी असणाऱ्या भाजी मंडई, किराणा दुकान, दूध डेअरी, औषधाची दुकाने अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानासमोर योग्य ते अंतर ठेवून रिंगण आखून देण्यात आले आहे.
चांदिवली येथील म्हाडा कॉलोनीमध्ये असणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा स्थानिक नगरसेवक आणि पालिकेच्या माध्यमातून सुरक्षित अंतरावर अशाच प्रकारे रेषा मारत सोशल डीस्टेन्सिंगचे नियोजन करण्यात आले आहे.
ग्राहकांसोबतच विक्रेत्यांनी देखील दिलेल्या रिंगणातच उभे राहून अत्यावश्यक सेवा पुरवण्याचा सल्ला पालिका आणि जनप्रतिनिधीकडून देण्यात आला आहे. जनतेने लॉक डाऊनचे पूर्णतः नियम पाळत अत्यावश्यक सामान आवश्यक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सामानासाठी मोठा प्रमाणात गर्दी करू नये, तसेच सोशल डीस्टेन्सिंग पाळावे असे आवाहन सुद्धा यावेळी पालिका आणि महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले आहे.
सोशल डीस्टेन्सिंगचा नियम पाळण्याचा आदेश मिळताच मोरारजीनगर आरे रोडवर असणाऱ्या पटेल स्टोअर्सने या नियमाचा पालन करण्याचा निर्णय घेत आपल्या दुकानासमोर सुरक्षित अंतरावर बॉक्स बनवत लोकांना याबाबत जागरूक केले होते. आता पवईसह चांदिवलीतील अनेक दुकानदारांनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली असून, प्रशासनही त्यास आवश्यक ती सर्व मदत पुरवताना दिसत आहे.
चांदिवलीतील संघर्षनगर भागात अजूनही या सारख्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत मात्र पोलीस प्रशासन येथे नागरिकांनी सोशल डीस्टेन्सिंगच्या नियमनाचे पालन केले जावे यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी साकीनाका पोलीस गस्त घालत योग्य ती खबरदारी घेताना आढळून येत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.