महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून न्यायालयाची नोटीस बजावणाऱ्या ऍमेझॉन कंपनीविरोधात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवार, २५ डिसेंबरला पवईतील ऍमेझॉन कार्यालयात तोडफोड केली होती. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मनसेच्या आठ कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ऍमेझॉन कंपनीने आपल्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या मागणीचा विचार न करता कंपनीने अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्याने कार्यकर्ते संतापले होते. याबाबत मनसे सैनिकांनी आक्रमक भूमिका घेत विविध ठिकाणी ऍमेझॉन कार्यालयावर धाबा बोलला होता. साकीविहार रोडवर असणाऱ्या ऍमेझॉन कार्यालयातही काही मनसे सैनिकांनी घुसत येथील वस्तूंची तोडफोड केली होती.
या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात आठ कार्यकर्त्यांविरोधात भादवि कलम ४५२, १५३, १४५, १४७, १४९, ४२७, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सदर गुन्हा हा साकीनाका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, शेवटची माहिती हाती आली तेव्हा ४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
No comments yet.