
प्रातिनिधिक छायाचित्र
व्यावसायिक असल्याचे सांगून ऑनलाईन मैत्री करून २६ वर्षीय एअर होस्टेस तरुणीला ६ लाखाचा गंडा घातल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. याबाबत तरुणीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने आरोप केला आहे की, ऑनलाइन मैत्री करणाऱ्या एका व्यक्तीने तिची ६ लाख रुपयांची फसवणूक केली.
तरुणीच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये एअर होस्टेस तरुणीची सोशल मिडियातून एका तरुणाशी मैत्री झाली होती. त्याने स्वतःची ओळख आरव कपूर म्हणून करून दिली होती. दोघांच्यातील ऑनलाईन संवादा दरम्यान तो चंदीगडमधील एक व्यापारी असल्याचा दावा त्याने केला होता. सोबतच त्याचे पालक एका कार अपघातात मरण पावले असल्याचे त्याने सांगितले होते.
जवळपास महिनाभर दोघे वेगवेगळ्या सोशल मिडिया अपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर सप्टेंबरपासून दोघांच्यात व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद सुरु झाला. चांगली मैत्री होत असल्याचा फायदा घेत त्या आरोपीने संवादा दरम्यान तरुणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल, व्यवसायाबद्दल आणि पार्श्वभूमीबद्दल माहिती घेतली.
पुढे संभाषणांदरम्यान, आरोपीने तरुणीकडे न्यायालयीन खटल्यांशी संबंधित कर्ज आणि कायदेशीर खर्चाचे कारण देत पैशांची मागणी केली. त्यानंतर एअर होस्टेस तरुणीने त्याला जवळपास ५.९ लाख रुपये एका बँक खात्यात ट्रान्सफर केले जे आरोपीने त्याच्या एका कर्मचाऱ्याचे असल्याचा दावा केला होता.
मात्र त्यानंतर आरोपीच्या व्यवहारात बदल येत असल्याचे आढळून आल्याने तरुणीला संशय आला आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्याचे फोटो तपासल्यानंतर तिला असे आढळून आले की त्याने बनावट प्रोफाइल तयार केले आहे.
या खुलाशानंतर, तरुणीने तिचे पैसे परत करण्याची आरोपीकडे मागणी केली, परंतु तो टाळाटाळ करत असल्याने अखेर तिने पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
पोलीस त्याच्या सोशल मिडिया प्रोफाईल, आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवून चंदीगडमधील त्याच्या ठावठिकाणाचा शोध घेत आहेत.
No comments yet.