पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा छडा लावण्यात मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पथकाला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक ऊर्फ दिपू नथूप्रसाद वर्मा (वय २६) या आरोपीला गुजरातमधील सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत. एका आठवड्यापूर्वी झालेल्या वादाचा रागातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पवई येथील साकी विहार रोडवर असलेल्या लोढा सुप्रीमस आऊट गेटजवळ, तुंगा गाव येथे एका ५५ वर्षीय इसमावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. हल्लेखोराने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गंभीर वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या युसूफ (पूर्ण नाव माहिती नाही) नावाच्या या इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विजय अरुण घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि समांतर तपासाची चक्रे फिरवली. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील जवळपास १०० हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तपासादरम्यान आरोपी हा गुन्हा केल्यानंतर थेट गुजरातला पळून गेल्याची व सध्या सुरत येथील पुष्पक नगर, राजस्थानी स्कूल जवळ, जीआयडीसी (GIDC) परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
गुन्हे शाखेचे पथक तातडीने सुरत येथे रवाना झाले आणि त्यांनी आरोपी दीपक वर्मा याला ताब्यात घेतले. मुंबईत आणून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आठवड्यापूर्वी मयतासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून त्याने हा खून केल्याचे सांगितले. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील असून सध्या पवईत राहत होता. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पवई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी कक्ष १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे, सपोनि गणेश तोडकर, पूनम यादव, अश्विनी रायबोले, योगेश जाधव, पोउपनि संदेश इंगळे, स.पो.नि. संग्राम पाटील (कक्ष ८), स.फौ. धारगळकर, पो.हवलदार माने, धनवडे, जगताप, मोरे, जाधव, पोलीस अंमलदार डफळे, निकम, मांडवे, निर्मळे आणि पोलीस अंमलदार शिंदे, तसेच पो.हवलदार संग्राम अतिग्रे व पो.हवलदार राहुल सकट (कक्ष ८) पथकाने बजावली.



No comments yet.