पवई तलावात ११० फुटांचा बुद्ध पुतळा उभारावा; ‘तथागत स्मारक समिती’चा १४ वर्षांपासून पाठपुरावा

प्रातिनिधिक छायाचित्र

हैदराबादच्या हुसेन सागर तलावाच्या धर्तीवर मुंबईतील पवई तलावाच्या मध्यभागी तथागत गौतम बुद्ध यांचा ११० फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी ‘पवई तलाव तथागत स्मारक समिती’ने पुन्हा एकदा केली आहे. या संदर्भातील प्रस्तावावर महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीचे संयोजक गौतम साबळे यांनी केली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुंबईच्या महापौर आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात निवेदने सादर करण्यात आली आहेत. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यासह स्थानिक खासदारांनाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

२०१२ पासून सातत्याने पाठपुरावा

६ मे २०१२ च्या बुद्ध जयंतीपासून ही मागणी केली जात आहे. तत्कालीन मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवून पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. तसेच, १ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन महापालिका आयुक्तांनीही मागणीला मान्यता दिल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र, या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नाही, अशी खंत समितीने व्यक्त केली आहे.

पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा

पवई तलाव आधीच एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. हा पुतळा उभारल्यास मुंबईच्या पर्यटन आकर्षणात मोठी भर पडेल. कान्हेरी, कोंडिविटा (महाकाली) आणि जोगेश्वरी लेण्यांच्या बौद्ध वारशाच्या पार्श्वभूमीवर हे स्मारक सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

अमृत महोत्सवापूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २०३०-३१ पूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनांची केवळ अंतर्गत प्रशासकीय टोलवाटोलव न करता, वरिष्ठ पातळीवर या प्रकल्पाबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन समितीने सरकारला केले आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!