पवईतील बेकायदा डिझेल तस्करीचा पर्दाफाश; ४,५०० लिटर इंधनासह ४१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना बेड्या

गुन्ह्यात अटक आरोपींसह पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी

पवई परिसरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या हिरानंदानी येथील आरक्षित वाहनतळाचा वापर करून बेकायदेशीररीत्या आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाची साठवणूक व काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी रात्रपाळी गस्तीदरम्यान पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४,५०० लिटर इंधन, तीन मालवाहू वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ४१ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना अटक केली आहे.

रात्रपाळी गस्तीदरम्यान संशयातून मोठा उलगडा

पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब दणाने हे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सह.पोउपनि. टिळेकर, पो.ह. झेंडे, पोशि. शेट्टी, पोशि. शिंदे तसेच बीट क्रमांक २ चे सहायक पोलीस निरीक्षक आण्णा ठोंबरे यांच्यासह १२ नोव्हेंबरच्या रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक गस्त घालत होते. १३ नोव्हेंबरच्या सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हिरानंदानी पवई येथील ‘नॉटी यार्ड’ हॉटेलच्या बाजूला असलेल्या आरक्षित वाहनतळाकडे (कोपरी पवई – न.भु.क्र. ७/५) एक पिकअप वाहन संशयास्पदरीत्या आत प्रवेश करताना पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिस पथकाने तात्काळ वाहनतळावर जाऊन पाहणी केली असता, तीन इसम लोखंडी ड्रममधून विद्युत पंपाच्या साहाय्याने एका महिंद्रा पिकअप टँकरमध्ये डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थ भरत असल्याचे आढळून आले. “पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे इंधनाबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली. कोणत्याही प्रकारच्या अग्निसुरक्षा उपायांशिवाय अशा प्रकारे ज्वलनशील पदार्थाची हाताळणी करणे अत्यंत धोकादायक असल्याने पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेतले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली,” असे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

काळाबाजार वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पिक-अप वाहने

शिधावाटप अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि शिधावाटप निरीक्षक दीपक कदम यांना घटनास्थळी पाचारण केले. दोन स्थानिक पंचांच्या समक्ष तीन वाहनांची झडती घेण्यात आली. “महिंद्रा पिकअप टँकर (क्र. एम.एच. ०३ ई.एस. ८६७३) मधून १,५०० लिटर, दुसऱ्या महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच. ०३ एफ.सी. ५३०६) मधील ३ लोखंडी ड्रममधून ६०० लिटर, तर टाटा एन्ट्रा पिकअप (क्र. एम.एच. ०३ ई.जी. २२७०) मधील १२ लोखंडी ड्रममधून २,४०० लिटर असा एकूण ४,५०० लिटर डिझेल सदृश द्रवपदार्थ जप्त करण्यात आला. या इंधनाची एकूण किंमत ४ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे,” असे पोलीस उपायुक्त यांनी सांगितले.

याशिवाय, पोलिसांनी १५ लाख, १२ लाख आणि १० लाख रुपये किमतीची तीन वाहने, १५ रिकामे ड्रम, एक विद्युत पंप आणि आरोपींचे मोबाईल फोन असा एकूण ३७ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. रासायनिक तपासणीसाठी इंधनाचे नमुने सीलबंद करण्यात आले आहेत.

या प्रकरणी अफरोज अब्दुल बारी खान (वय ३०), सैबाज इलियास खान (वय २१, दोघेही रा. चिराग नगर, घाटकोपर पश्चिम) आणि मोहम्मद मोईन नसीम खान (वय ४३, रा. रमाबाई नगर, घाटकोपर पूर्व) यांना पोलिसांनी अटक केली आहे. “आरोपींनी हा साठा चोरून आणल्याचा संशय असून, त्यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, २८७, ३०३(२), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि मोटर स्पिरीट व हाय स्पीड डिझेल ऑर्डरच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अत्माजी सावंत यांनी सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!