पवई येथील हिरानंदानी संकुलातील प्रमोद महाजन वन उद्यानाच्या नूतनीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) २.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या सहा एकरांच्या विस्तीर्ण वनक्षेत्रातून जाणाऱ्या नियोजित विकास नियोजन (डीपी) रस्त्याची टांगती तलवार कायम असतानाच हा खर्च केला जात असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालिकेच्या स्थायी समितीने प्रमोद महाजन वन उद्यान आणि लगतच्या अटलबिहारी वाजपेयी उद्यानासाठी ५.६५ कोटी रुपयांचा संयुक्त विकास प्रस्ताव मंजूर केला आहे. यातील २.७५ कोटी रुपये प्रमोद महाजन उद्यानातील संरक्षक भिंती, मुख्य प्रवेशद्वार, अंतर्गत पदपथ, विश्राम मंडप (गॅझिबो), सार्वजनिक बाकडी, खुली व्यायामशाळा आणि लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी वापरले जातील.
दुसऱ्या बाजूला, १३.४ मीटर रुंद डीपी रस्त्यापैकी आठ मीटर लांबीचा मार्ग हा या उद्यानातील हरित पट्ट्यातून प्रस्तावित आहे. सर्वेक्षणानुसार या रस्त्याच्या प्रकल्पामुळे किमान १२२ झाडांना फटका बसण्याचा अंदाज होता; प्रत्यक्षात मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे उद्यान १५,००० हून अधिक स्थानिक आणि विदेशी वृक्षांनी समृद्ध असून सुवर्ण पक्षी (गोल्डन ओरिओल), कोतवाल (ब्लॅक ड्रोंगो) आणि कोकिळा यांसारख्या विविध पक्ष्यांचे हक्काचे आश्रयस्थान आहे.
उद्यानातून जाणाऱ्या रस्त्याची माहिती समोर येताच चहू बाजूने सिमेंटच्या जंगलाने वेढलेल्या या भागात हिरवळीने नटलेले हे वन उद्यान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी उद्यानातून जाणाऱ्या रस्त्याला विरोध दर्शवला आहे. प्रशासकीय पातळीवर विविध ठिकाणी स्थानिक नागरिक यांच्याकडून याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आले असून, अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीची निवेदने देण्यात आली आहेत.
स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर आमदार सुनील राऊत यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने हा रस्ता रद्द करण्याची मागणी केली. प्रशासनाने यावर पुनर्विचार करत असल्याचे मान्य करत उद्यान वाचवण्याची भूमिका घेतली असली, तरी डीपी विभागाने अधिकृत विकास आराखड्यातून हा रस्ता अद्याप कागदोपत्री रद्द केलेला नाही. असे असताना या उद्यानाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांचा हा खर्च केला जात असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.



No comments yet.