साकीनाका येथील एका तरुणाला फ्रेंड्सशिप क्लबच्या साहय्याने कंटाळवाण्या स्त्रियांना खुश करण्यासाठी १८ हजार रुपये मोबदला देण्याचा बहाणा करत हनीट्रॅपमध्ये अडकवून १.३ लाखाला गंडवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करून, तपास सुरु केला आहे.
साकीनाका येथे राहणारा आणि हिरे पॉलिश करणाऱ्या कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या सुरज कुमार गुप्ता (बदललेले नाव) याला ३१ जानेवारीला एका महिलेने फोन करून “फ्रेंड्सशिप क्लब”मध्ये शामिल होण्यासाठी तरुणांचा शोध सुरु असल्याचे सांगितले. या क्लबच्या माध्यमातून श्रीमंत, कंटाळवाण्या महिलांचे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक अपॉइंटमेंटसाठी १८,००० रुपये मोबदला मिळणार असल्याचे सुद्धा यावेळी त्या महिलेने सांगितले.
गुप्ताला आपले म्हणणे पटत असल्याचे लक्षात येताच तिने यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २००० रुपये देण्यास सांगितले. त्याची पूर्तता होताच तिने एका बैठकीस उपस्थित राहण्यास सांगून मीटिंग फी म्हणून आणखी १०,००० रुपये भरण्यास सांगितले. रक्कम जमा होताच तिने चार स्त्रियांची छायाचित्र पाठवून निवडायला सांगितले. मीटिंगसाठी एक हॉटेल बुक करावे लागेल आणि जर ३६००० रुपये जमा केले तर संपूर्ण महिनाभर हॉटेल रूम बुक केले जाईल सोबतच एक गोल्ड कार्ड आणि कॅश रिवार्ड पॉईंट सुद्धा मिळतील असे तिने गुप्ता याला सांगितले असल्याचे त्याने साकीनाका पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
‘दुसऱ्या दिवशी त्या टेली-कॉलरने पुन्हा फोन करून, आरोग्य तपासणी करावी लागेल आणि ग्राहकांना त्याचा रिपोर्ट सादर करावा लागेल. यासाठी ४६ हजार रुपये जमा करावे लागतील ज्यानंतर त्यांचा एक माणूस येवून चेक-अप करेल असे त्याला सांगितले’ असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
पैसे भरल्यानंतरही संध्याकाळी ५ पर्यंत कुणीही आले नाही त्याच्यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे गुप्ताच्या लक्षात येताच त्याने साकीनाका पोलिसांना लेखी तक्रार दिली.
तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी भादंवि कलम ४१९, ४२०, ३४ अनुसार गुन्हा दाखल करून, तक्रारदार याने रक्कम जमा केलेले खाते गोठवले आहे. साकीनाका पोलीस ठाणेचा माहिती तंत्रज्ञान विभाग याचा अधिक तपास करत आहे.
No comments yet.