चांदिवली फार्मरोडवरील एका सराफाला १० लाख ४३ हजार रुपयांना एका ठगाने गंडवल्याची घटना घडली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रमेश जैन यांचे चांदिवली फार्मरोड परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी दुकानामध्ये एक व्यक्ती दागिने पाहण्यासाठी आला होता. मी खूप दागिने खरेदी करणार असल्याचे सांगत त्याने जैन यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर एक दिवस त्या व्यक्तीने परत दुकानात आल्यानंतर २९० ग्रामच्या १६ सोनसाखळ्या खरेदी केल्या, ज्याचे १० लाख ४३ हजार एवढे बिल झाले होते.
त्या व्यक्तीने आपल्या खात्यातून एनईएफटीच्या माध्यमातून जैन यांच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली, मात्र खात्यात कमी पैसे असल्याने रक्कम ट्रान्सफर झाली नाही. यावर मी घरी जाऊन पैसे पाठवतो असे त्याने जैन यांना सांगितले. जैन यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत दागिने त्याला दिले.
मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने ना पैसे ट्रान्सफर केले, ना बिलाची रक्कम आणून दिली. वारंवार फोन करूनही तो उचलत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
साकीनाका पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे.
No comments yet.