पवईतील एका हॉटेल मालकाला खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १० ने बेड्या ठोकल्या आहेत. सचिन उर्फ बाबू मोहिते (३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खंडणी, मारहाण सह दंगलीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
शनिवारी २५ मे रोजी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेलच्या मालकाला मोहिते याने २५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी त्याने हॉटेल मॅनेजर आणि मालकाला शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. यासंदर्भात हॉटेल मालकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सराईत गुन्हेगाराचा सहभाग आणि गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा कक्ष १० सुद्धा याचा समांतर तपास करत होती. गुन्हा दाखल होताच आरोपी लपून बसला होता. ‘तांत्रिक माहितीसह खबऱ्याना त्याची माहिती काढण्याचे काम सोपवण्यात आले होते. तपास सुरु असतानाच २६ मे रोजी आमच्या खास खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला मरोळ भागातून अटक करण्यात आली आहे’ असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘आरोपी विरोधात खंडणी, मारहाण आणि दंगलीच्या गुन्ह्यांची नोंद सुद्धा आहे.’
No comments yet.