मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी (५ ऑक्टोबरला) रात्री पवई परिसरात छापा टाकत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. अंचित कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत.
शनिवार, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. क्रुझवर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत एनसीबीचं धाडसत्र सुरु असून, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. मंगळवारी पवईमध्ये सुद्धा याच अनुषंगाने एनसीबीने धाड टाकली.
कार्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छापेत पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहे. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या ८ जणांच्या चौकशीतून रविवारी रात्रीपासून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला आणि या प्रकरणांशी निगडीत लोकांना ताब्यात घेण्यात येत आहे.
कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अंमली पदार्थ पुरवले जातात या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती चौकशीतून एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
No comments yet.