२००५ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असल्याचे सांगून, साकीविहार येथील व्यवसायिकाची १७.३८ लाखाची फसवणूक करून फरार झालेल्या ८ वी पास तोतया आयएएस अधिकाऱ्याला साकीनाका पोलिसांनी दुसऱ्या सावजाच्या शोधात असताना पुण्यातून अटक केली आहे. सुरेश यादव (४२) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शिक्षकाच्या नोकरीत चांगले उत्पन्न मिळत नसल्याने सुलतानपूरचा असलेला सुरेश यादव एप्रिल महिन्यात मुंबईत आला होता. साकीविहार रोडवर असणाऱ्या एका इमारतीत त्याने वॉचमेन म्हणून नोकरी करावयास सुरुवात केली. याच सोसायटीत राहणारे आरिफ खान (४४) यांच्याशी त्याने ओळख वाढवली. उत्तम इंग्रजीच्या आधारावर त्यांना आपली ओळख २००५ बॅचचे बिहार कॅडरचे आयएएस अधिकारी असल्याची करून दिली. गुन्हेगार वृत्तीच्या लोकांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे त्यांला सस्पेंड केले गेले आहे आणि वाढत्या धोक्याला पाहून त्यांनी येथे मुंबईत वॉचमेन म्हणून नोकरी स्विकारल्याचे त्याने खान यांना सांगितले.
एक दिवस अचानक खान यांच्या फोनवर साकीनाका पोलीस स्टेशनमधून फोन आला व ‘यादव यांना दिल्ली सिलेक्शन बोर्डाने त्यांचे सस्पेंशन परत घेतल्याचे सांगा’ असा निरोप दिला. ज्यानंतर खान यांचा यादव हा खरेच आयएएस अधिकारी असल्याचा विश्वास झाला. खान जेव्हा यादवला हा निरोप देण्यास गेले तेव्हा त्याने ‘हो माझा फोन युपीचा आहे, इथे लागत नाही म्हणून मी तुमचा नंबर दिला होता’ असे त्यांना सांगितले.
“एवढा मोठा अधिकारी वॉचमेनचे काम करत असून, कुठेतरी कोणपाड्यात राहतो, म्हणून मी आपल्या स्टोअर हाऊसमध्ये त्याच्या राहण्याची सोय केली. त्यास दिल्लीला जाण्यासाठी तिकीट आणि तीस हजार रुपयांची सोय केली. त्याने आठवड्यानंतर मला फोन करून एअरपोर्टवर नेण्यास बोलावले आणि त्याची ऑर्डर रद्द झाल्याचे सांगितले. ज्यानंतर मी त्याला खर्चासाठी पैसे लागतील म्हणून आपले डेबिट कार्ड व पिन नंबर दिला होता. महिन्याभरात १७.३८ लाख रुपये काढल्यानंतर मे महिन्यापासून तो गायब झाला आहे आणि त्याचा फोनही बंद येत आहे”, असे तक्रारदार खान यांनी पोलीस जवाबात सांगितले.
“तपासात यादव याने ठाणे आणि मुंबई भागात अजून तीन लोकांना अशाच प्रकारे ठगवले असल्याचे समोर आले. खान यांच्याकडून पैसे घेऊन दिल्लीसाठी निघालेला यादव मुळात तिकडे गेलाच नव्हता, तिकीट रद्द करून त्याने ठाण्यात एक आठवडा वास्तव्य केले. परतल्यावर त्याने खान यांचे १७.३८ लाख रुपये घेऊन आपल्या घरी युपीला पळ काढला”, असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.
‘वीस वर्षापासून त्याने अशा प्रकारे खोटे आयएएस अधिकारी असल्याचे सांगून लोकांना ठगने सुरु केले आहे. २००५ साली वकील शोभालाल यादव यांची फसवणूक केल्यानंतर युपी, बिहार, गाझियाबाद, ओरिसा, वेस्ट बेंगाल, दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्याने अनेक लोकांना खोटे बोलून आणि आयएएस अधिकारी असल्याचे सांगून ठगवले आहे. ज्यातील अनेक गुन्ह्यात त्याला अटकही झाली आहे. मात्र, तो पुन्हा त्याच मार्गाने जात आहे,”असे तपासी अधिकारी पोऊनि आंधे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “२०१२ मध्ये जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने गावापासून जवळ असणाऱ्या सरस्वती स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. तीन वर्ष नोकरी केल्यावर पुरेसा पैसा मिळत नसल्याने ‘चांगला जॉब बघा’ असे बायकोच्या सांगण्यावरून त्याने मुंबईला येण्याचे नक्की केले. एप्रिल महिन्यात मुंबईला आल्यावर केवळ एका महिन्यातच ४ लोकांची फसवणूक करून २५ लाख घेऊन तो परत आपल्या गावी घरी परतला.”
यादवच्या शोधात युपीला पोहचलेल्या तपासी पथकाला तो पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माग काढत सावजाच्या शोधात असलेल्या यादवला पुण्यातून अटक केली आहे.
कोर्टात हजर केले असता सुरेश यादवला पोलीस कोठडी देण्यात आली असून, त्याने अजून किती लोकांची फसवणूक केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.