पवई येथे राहणाऱ्या कोस्टगार्ड अधिकारी यांच्या पत्नीला इंटरनेटवर मिळालेल्या मूव्हर्स आणि पॅकर्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीने ठगल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात आपल्या पतीच्या मित्राला मिझोरम येथे स्कोर्पिओ, एसयुव्ही कार पाठवण्याचे काम अधिकाऱ्याच्या ३४ वर्षीय पत्नीने इंटरनेटवर नंबर मिळालेल्या अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीला सोपवले होते. एसयूव्हीच्या डिलीव्हरीचा मोबदला म्हणून ३३८०६ रुपये मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीच्या बँक खात्यात ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र, मार्च महिना उजाडला तरी गाडी पोहचवली गेली नसल्याने आणि कंपनीचा कोणताच संपर्क होत नसल्याने तिने अखेर पवई पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिलेने पवई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पतीचा मित्र एक पांढऱ्या रंगाच्या सेकंडहॅंड स्कोर्पिओ कारच्या शोधात होता. ३ – ४ दिवसाच्या शोध मोहिमेनंतर कल्याणच्या एका डिलरकडे तशी कार विक्रीसाठी असल्याचे त्याला आढळून आले. जानेवारी १३ तारखेला त्याने ३.२५ लाख रुपये देवून ती कार खरेदी केली. आम्हाला डिलीव्हरी घेण्यास आणि कागदपत्रांची पूर्तता करून सदर कार त्याच्याकडे पाठवण्याची विनंती केली. फेब्रुवारीमध्ये आम्हाला कारची डिलीव्हरी मिळाली होती.
तक्रारदार महिला इंटरनेटच्या माध्यमातून मूव्हर्स अँड पॅकर्सचा शोध घेत असताना त्यांना अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीचा नंबर मिळून आला. त्यांच्याशी संपर्क साधून, आलेल्या दोन इसमांना गाडी सुपूर्द केली. मला कंसाइंटमेंट डिलिव्हरी इनव्हॉइस सुद्धा दिले गेले. मात्र मार्च १० पर्यंत गाडी निर्धारित ठिकाणी पोहचली नाही, असेही तक्रारदार महिलेने आपल्या पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
‘कंपनीने दिलेल्या चलनावरील दोन्ही पात्यांवर जावून आम्ही पहिले असता, कंपनीचे कसलेही कार्यालय त्या ठिकाणी आढळून आले नाही. त्यांनी फसवणुकीच्या बहाण्याने इंटरनेटवर आपला नंबर दिला होता आणि तक्रारदार त्याला बळी पडले आहेत. कंसाइंटमेंट डिलिव्हरी इनव्हॉइस सुद्धा बनावट बनवण्यात आले आहे. त्यांनी पैसे भरलेल्या बँक खात्याची माहिती आणि सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही मागवले असून, त्याच्या आधारावर तपास सुरु आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.