पवईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या हिरानंदानी गार्डन्स येथील डेल्फी इमारतीच्या ५व्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज, बुधवार १ जुलै रोजी सकाळी घडली. एसीच्या डक्टमध्ये शोर्ट-सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.
पवईतील हिरानंदानी परिसरातील डेल्फी इमारतीमध्ये ५व्या मजल्यावरून आगीचे लोळ आणि धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच फायर इंजिन, एक फोम टेंडर आणि चार जम्बो टंकर घटनास्थळी दाखल झाले.
“या इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या एका लॅब कार्यालयातील एसी डक्टला ही आग लागली होती. त्याची झळ सहाव्या मजल्यापर्यंत पोहचत डक्टमधून आगीचे गोळे खाली पडत असल्याने संपूर्ण डक्ट आणि इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर धुराचे साम्राज्य पसरले होते,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. “लॅबमधील एसी हा २४ तास सुरु ठेवणे आवश्यक असते. त्यातच शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. कार्यालयाच्या आतील भागात मोठे नुकसान झालेले नाही” असे इमारत प्रशासनाने याबाबत बोलताना सांगितले.
“इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. यात येथील वायरिंग, इंस्टॉलेशन, केबल आणि एसी जळून खाक झाले आहेत,” असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले.
“सकाळी ६.१६ वाजता अग्निशमन विभागाला हिरानंदानी पवई येथील डेल्फी इमारतीच्या ५व्या मजल्यावरील ३००० चौरस मीटर ऑफिसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. आग विझवण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही. असे पालिकेने ट्वीटच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
हीरानंदानी, पवई येथून सकाळी ६:१६ वाजता अग्निशमन विभागाला कॉल आला.
आग डेल्फि बिल्डिंगच्या ५व्या मजल्यावरील ३००० चौरस मीटरच्या कार्यालयात लागली होती.
८:४० वाजता ५ मोटर पंपच्या ३ छोट्या इंजिनचा वापर करून आग विजवण्यात आली.
या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.#AtMumbaisService pic.twitter.com/M1nYZmjY9P— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 1, 2020
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.