पवईमधील चंदननगर जवळ बांधकाम सुरु असणाऱ्या एका इमारतीच्या अकराव्या मजल्याला आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) रात्री ९.३५ वाजता घडली. ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.
संध्याकाळी ९.३५ वाजता पवई, गांधीनगर येथील चंदननगर पासून काही अंतरावर नवीन बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या सर्वात वरच्या माळ्यावरून धूर निघत असल्याचे काही स्थानिकांना आढळून आले. “याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ बंब आणि टँकरनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.” असे यावेळी बोलताना अग्निशमन अधिकारी कुडाळ यांनी सांगितले.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत असून आमचा अधिक तपास सुरु आहे, असे यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आगीच्या घटनेमुळे गांधीनगर – पवई रोडवर (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड) वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे काही काळासाठी विक्रोळी – हिरानंदानी लिंकरोड मार्गे वाहतूक वळवण्यात आली होती.
No comments yet.