इंडियन ओव्हरसीज बँक साकीनाका शाखेचे माजी व्यवस्थापक त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव (वय ५०) आणि त्याचा साथीदार मुबारक वाहिद पटेल (वय ५४) यांना साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. माथाडी कल्याण मंडळाच्या सहा मुदत ठेवींमधून पाच कोटी रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुबारक पटेल हा आयुर्वेद डॉक्टर आहे.
कापड बाजार आणि दुकान मंडळ हे माथाडी कामगारांच्या पगाराचे नियोजन करतात, तसेच लेव्हीच्या रकमा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवल्या जातात. याच नियोजनानुसार मंडळाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात विविध ६ ठेवीच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांच्या ठेवी साकीनाका येथील इंडियन ओव्हरसिस बँकेत ठेवल्या होत्या. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात या बँक ठेवींची मुदत संपणार होती. माथाडी मंडळाने २४ ऑक्टोबरला बँकेकडे आपल्या ठेवींबाबत चौकशी केली असता, ठेवी ठेवल्याच्या एक महिन्याच्या कालावधीत काढून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती मंडळाला मिळाली.
आपल्या पैशांची चोरी झाली असल्याचे लक्षात येताच मंडळाचे अध्यक्ष दिनेश दाभाडे यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.
भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा नोंद करून, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) अंकित गोयल यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बुधन सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक पडवी, पोलिस उपनिरीक्षक ढवण, पोलीस उपनिरीक्षक जागडे यांचे एक पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला होता.
“चौकशीत शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक त्रिभुवनसिंग यादव यांचा सहभाग आढळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, अजून एक साथीदार मुबारक वाहिद पटेल याच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी सांगितले.
मार्च २०१८मध्ये एफडी तयार झाल्यानंतर महिनाभरातच २० एप्रिलला हा पैसा काढून घेण्यात आला होता. इंडियन ओव्हरसीज बँकेने २ महिन्यांसाठी ६.७५ टक्के व्याज दिल्यानंतर दुसऱ्या बँकेतून रक्कम काढून या बँकेतील एफडी योजनांमध्ये हे पैसे गुंतवण्यात आले होते. जेव्हा मंडळाने ऑक्टोबरमध्ये ठेव कालावधीबाबत बँकेकडे चौकशी केली तेव्हा ही फसवणूक झाल्याचे समोर आले. एफडी मुदतपूर्व परवानगीशिवाय मोडू नये किंवा वैयक्तिक कर्ज किंवा तारण सुविधा घेण्यासाठी त्यांचा उपयोग करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश असतानाही हे घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
“आरोपींनी गुन्हा करण्यासाठी बोर्डाचे बनावट लेटर हेड आणि सह्या करून सर्व रक्कम भांडूप येथील विजया बँकेत हस्तांतरित केली होती. या गुन्ह्यात अधिक आरोपींचा सहभाग असल्याचे दिसते.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
मुबारक पटेल हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, २०१६मध्ये कल्याण येथील एका माथाडी मंडळाच्या १० कोटीच्या अपहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. कल्याण मध्यवर्ती कारागृहातून या गुन्ह्यात पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.