व्यवसायासाठी १०० कोटीचे लोन करून देतो असा बहाणा करून एका व्यावसायिकाला २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप सिंग (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.
फिर्यादी प्रणव जानी यांचा विलेपार्ले येथे गारमेंटचा व्यवसाय आहे. त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असल्याने ते लोन मिळवण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यानच्या काळात अटक आरोपी दिलीप सिंग याच्याशी त्यांची ओळख झाली होती. दिलीपने त्यांच्या लोनच्या प्रक्रियेसाठी त्याचा सहकारी हरप्रीत याच्याशी ओळख करून दिली. हरप्रीत याने त्याचा साथीदार जावद याच्याशी ओळख करून दिली होती.
“आरोपींनी तक्रारदार यांना १०० कोटीचे लोन करून देण्यासाठी २५ लाख रुपये कमिशनची मागणी केली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
प्रणव यांनी २५ लाख दिल्यानंतरही त्यांचे लोन होत नसल्याने त्यांनी पाठपुरावा केला असता त्यांना चालढकल करणारी उत्तरे मिळाल्याने आणि फोन बंद येत असल्याने त्यांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
“पैसे जमा झालेल्या खात्याची माहिती मिळवली असता. त्याचा जुन्या गाड्यांचा व्यवसाय असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत आरोपीने त्याच्याकडे एक महागडी गाडी बुक केली होती आणि त्या गाडीचे पेमेंट म्हणून ती रक्कम जमा करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आरोपीला त्याच्या खारघर येथील राहत्या घरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी विशाल कोरडे यांनी सांगितले.
कार्यपद्दती
“आरोपी हे दिल्ली, कर्नाटक, बंगलोर, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथे विविध भागात लोकेशन बदलत फिरत असतात. विविध ठिकाणी हॉटेल बुक करून सावज शोधात असतात. सावज बळी पडताच काही तासातच ते गायब होतात. आपल्या येथील केसमध्ये सुद्धा विलेपार्ले येथील व्यावसायिकाला हिरानंदानी पवई येथे बोलावून आर्थिक व्यवहार केले होते.” असे पवई पोलिसांनी सांगितले
No comments yet.