मुलांनो आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व जाणा – कॅप्टन प्रसून कुमार, संपादक प्लॅनेट पवई
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते. महाभारत, पुराणे ज्यांनी लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा मंगलदिन म्हणजे गुरुपौर्णिमा. याला व्यासपौर्णिमा असे सुद्धा संबोधले जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. देशभर हा दिवस आपल्या गुरूला स्मरून त्यांच्या आदरार्थ साजरा केला जातो. मुलांनो आपल्या जीवनातील गुरुचे महत्व जाणा, असे उदगार वृत्तपत्राचे संपादक कॅप्टन प्रसून कुमार यांनी काढले. पवई इंग्लिश हायस्कूल येथे चंद्रभान शर्मा मेमोरिअल हॉलमध्ये आयोजीत गुरुपौर्णिमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वरिष्ठ पत्रकार प्रमोद चव्हाण, वैद्यकीय क्षेत्रातील शेखर नायर, मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या देशात रामायण – महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य असते. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य – जनक, कृष्ण, सुदामा – सांदिपनी, विश्वामित्र – राम, लक्ष्मण, परशुराम – कर्ण, द्रोणाचार्य – अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची तो हा दिवस.
अनेक शाळा, विद्यालयांतून, महाविद्यालयांतून विद्यार्थी आपआपल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये सुद्धा मंगळवारी गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे आभार प्रकट करतानाच, सोशल माध्यम फायदे – तोटे, शिक्षण पध्दती कशी असावी आणि संविधानाने चौथा आधारस्तंभ म्हणून स्थान दिलेल्या मिडियाची वाहवत चाललेली स्थिती यावर भाष्य करणाऱ्या विविध तीन नाटिका यावेळी सादर करत एक चांगला संदेश दिला.
“गुरुपौर्णिमा हे आमचे संस्कार आहेत. आमच्या संस्कृतीने दिलेले आमचे हे संस्कार पुढील पिढीला मिळायला हवेत, म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी शाळेत गुरुपौर्णिमेचे आयोजन करत असतो” असे याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई यांनी सांगितले.
भारताचे पहिले कम्युनिटी न्यूजपेपर प्लानेट पवईचे संपादक प्रसून कुमार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “गुरु हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. संपूर्ण आयुष्य आपण शिकतच असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला नव-नवीन गुरु मिळत जातात. मुलांनो आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व जाणा”, असे यावेळी बोलताना ते म्हणाले.
No comments yet.