कोरोना काळात आर्थिक गणित बिघडलेले असतानाच शाळेने फी भरण्यासाठी तगादा लावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र पवई मधील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिर्ले उदयकुमार यांनी समाजाला सोशल माध्यम आणि मित्रांच्या मदतीने आवाहन करत ४० लाख रुपये जमा करून केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवले नसून, त्यांना मुक्त बागडण्याची संधी दिली आहे. या कार्यातून त्यांनी इतर शाळा आणि सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पाच महिन्यांच्या कालावधीत ४० लाख रुपये जमवून २०० गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या एका वर्षाच्या शुल्काची त्यांनी व्यवस्था केली. सध्या त्या अशाच आणखी १२० गरजू विद्यार्थ्यांसाठी निधी जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजाराच्या रुपात आलेल्या वादळाने अनेक कुटुंबाना उध्वस्त केले असून, अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा केला आहे. लाखो लोक या आजाराला बळी पडले आहेत. लाखो बेरोजगार झाले आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक विद्यार्थी यापुढे शालेय फी भरणे परवडत नसल्याने शिक्षण थांबविण्याच्या मार्गावर आहेत. हे समाजाचे मोठे नुकसान करणारे ठरणार आहे.
पवई इंग्लिश हायस्कूल शाळा व्यवस्थापनाने अनेक विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले होते आणि विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सूट देखील दिली होती. मात्र बेरोजगार आणि आपले सर्वस्व गमावलेल्या अनेक कुटुंबाना तेवढी फी भरणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शिक्षणापासून दूर जाण्याचा निर्णय घेणेच योग्य समजले.
“जेव्हा शालेय फी डिफॉल्टर्सची यादी वाढत असून, पालकांनी मला भेटायला सुरुवात केली तेव्हा मी त्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. बर्याच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणापासून दूरू नेले होते. यात विशेषत: मुलींचा सहभाग अधिक होता. सर्वच गमावल्याने काही लोक मूळ गावी परतले होते. माझी झोपच उडाली. मी विचार करत होते की या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी मी काय करू? त्यानंतर मी सामाजिक माध्यम आणि मित्रांकडे या गरजू विद्यार्थ्यांची दुर्दशा स्पष्ट करणारे अपील पाठविणे सुरू केले. देव दयाळू आहे म्हणतात ते खोटे नाही. माझ्या प्रयत्नांना यश येताना दिसू लागले. ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट्स यांनी मदतीचा हात पुढे करत यांच्याकडून निधी जमा होण्यास सुरवात झाली,” असे याबाबत बोलताना शिर्ले उदयकुमार म्हणाल्या.
“या शाळेत शिक्षण घेणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांचे पालक रोजंदारीवर काम करतात. रोज कमवा आणि घर चालवा अशा जगणाऱ्या परिवारांसाठी ही परिस्थिती कठीण बनली आहे. मुख्याध्यापिकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचले आहे,” असे याबाबत बोलताना पालक शिक्षक संघटनेतर्फे सांगण्यात आले.
शिर्ले उदयकुमार ह्या गेली चार वर्षे मुख्याध्यापिका म्हणून या शाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. विध्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. विविध स्पर्धांमधून चमकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पवई इंग्लिश हायस्कूल नेहमीच अग्रेसर राहिले आहे.
एवढ्या मोठ्या कामानंतर त्यांच्यात याचा अभिमान आहे मात्र गर्व अजिबात नाही हेच त्यांच्या कामातून समोर येत असते. या उपक्रमाबद्दल अधिक बोलताना त्या म्हणाल्या, “मी त्या सर्वांची आभारी आहे ज्यांनी माझ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी माझ्या पुढाकाराला मदत करत निधी दिला. हे संपूर्ण श्रेय त्यांचेच आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंदी चेहरे हेच माझ्यासाठी समाधान देणारे आहे.”
शिर्ली उदयकुमार यांनी त्यांच्या या कार्यातून एक आदर्श निर्माण केला असून, अधिकाधिक लोकांनी प्रेरणा घेवून अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विध्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढे येण्याची गरज आहे.
No comments yet.