हिरानंदानी फाऊडेशन शाळेच्या (एचएफएस) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामुळे येथील विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र गेली कित्येक वर्षे हुलकावणी देत असणाऱ्या ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धे’च्या ट्राफिवर आपले नाव कोरत अजून एक मानाचा तुरा शाळेच्या शिरपेचात खोवला आहे. कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धा २०१९’मध्ये शाळेचे विद्यार्थी म्रिगांका शर्मा आणि अद्वैत सांगळे यांनी ‘नॅशनल फ्रँक अँथनी डिबेट ट्रॉफी’ जिंकली.
एचएफएसच्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र प्रथमच विद्यार्थ्यांनी ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. त्यांनी केवळ ट्रॉफीच नव्हे तर वैयक्तिक बक्षिसेही जिंकली. म्रिगांका शर्माला सर्वोत्कृष्ट वक्ता आणि अद्वैत सांगळे याला उपविजेतेपदाचा मान देण्यात आला.
फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत यावर्षी “लोकशाही” हा वादविवादाचा विषय होता. अंतिम फेरीसाठी “भारताला एकाधिकारशाहीची आवश्यकता आहे लोकशाहीची नाही” ह्या विषयावर वादविवाद करण्यात आला.
यावेळी बोलताना हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्याणी पटनायक म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आवश्यकता आहे.’ म्रिगांका आणि अद्वैत यांच्या विचार, संकल्पना आणि त्यांच्या वाद-विवाद कौशल्याचे सुद्धा त्यांनी कौतुक केले.
फ्रॅंक अँथनी यांच्या सन्मानार्थ ‘फ्रँक अँथनी मेमोरियल अखिल भारतीय आंतरशालेय इंग्रजी वादविवाद स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन – सीआयसीएसई) आयोजित केलेली ही सर्वात प्रतिष्ठित आंतरशालेय वार्षिक वादविवाद स्पर्धा आहे. प्रत्येकवर्षी १६०० शाळा सहभागी होणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना दोन गटात विभागले जाते. (अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी १ आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी २). स्पर्धा प्रादेशिक, विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवरील तीन स्तरांवर घेतली जाते.
फ्रँक अँथनी वादविवाद त्याच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि वर्गीकरणामुळे सर्व मानदंडांमध्ये अतुलनीय आहे. ही एक अत्यंत आव्हानात्मक वादविवाद स्पर्धा आहे, जी विद्यार्थ्याच्या कौशल्याची कसून परीक्षा घेते.
यावेळी स्पर्धेत एचएफएसच्या विद्यार्थ्याना शाळेकडून लाभलेल्या मार्गदर्शनाची सचोटी लावत दोन्ही विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व शाळेतील स्पर्धकांना आपल्या विचार, संकल्पना आणि कौशल्याने पछाडत ही मानाची ट्रॉफी आपल्या नावे केली.
No comments yet.