रामबाग म्हाडा, पवई लेकहाईटस इमारतीत घरकाम करणाऱ्या एका महिलेला, घरकामास येण्यास नकार दिला म्हणून मारहाण करणाऱ्या बक्षी याला पवई पोलिसांनी अखेर आज अटक केली. वॉलेंटीनो राफेल कॅन अहमद बक्षी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाईल.
रामबाग येथील पवई लेकहाईटस इमारतीत राहणाऱ्या बक्षी नामक एका इसमाने त्याच इमारतीत घरकाम करणाऱ्या ईश्वरा नायडू (बदलले नाव) यांना मारहाण केल्याची घटना गेल्या रविवारी पवईत घडली होती. घरकाम करण्यास येण्यास नकार दिल्याने सदर इसमाने हे कृत्य केले होते. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
याबाबत पवई पोलिसांनी भादवि कलम ३५४ (स्त्री चा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे), ३३७ (जीवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारया कृतीने दुखापत पोहचवणे), ३२३ (इच्छापुर्वक दुखापत पोहचवण्याबद्दल शिक्षा), ५०४ (शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे) नुसार गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरु केला होता.
“आरोपी इसम हा महिलांसोबत नेहमीच छेडछाड करत असल्याची माहिती अनेक महिला कामगारांनी पोलिसांना दिली होती. त्यासाठी महिला कामगार तसेच इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे जवाब नोंदवण्यात आले आहेत. सबळ पुराव्यांच्या आधारावर आज त्याला अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अजून एक अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले “अनेक कामगार महिलांचे आम्ही जवाब नोंदवले आहेत. तो अशा प्रकारचे कृत्य सतत करत असल्याचे समोर आल्यामुळे, त्याच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे जमा करणे आवश्यक होते.”
“बक्षी हा आपले वय लपवत तो जास्त वयाचा असल्याचे लोकांना भासवत असतो, मात्र त्याच्याजवळ असणारी अधिकृत कागदपत्रे तपासली असता तो केवळ २४ वर्ष वयाचा असल्याचे समोर आले आहे. चित्रपट, स्टायलिश राहणीमान सोबतच तारुण्याच्या वेडापायी तो हे सर्व कृत्य करत असतो. विशेष म्हणजे लहान मुलींसोबत सुद्धा छेडछाड केल्याचे समोर आले आहे, आम्ही त्या दृष्टीकोनातून ही तपास करत आहोत,” असे यावेळी बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
आज बक्षीला त्याच्या पवई येथील राहत्या घरातून अटक केली असून, त्याला हॉलिडे कोर्टात हजार केले जाणार आहे.
No comments yet.