महाराष्ट्र राज्य विधानसभा २०१९ निवडणुकीचे निकाल गुरुवारी २४ ऑक्टोबरला घोषित करण्यात आले असून, पवईत शिवसेनेच्या उमेदवारांना पवईकरांनी पसंती दर्शवली आहे. चांदिवली मतदार संघातून दिलीप भाऊसाहेब लांडे तर विक्रोळी मतदार संघातून सुनील राऊत याना पवईकरांनी पसंती दर्शवत निवडून दिले आहे. विक्रोळी विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाल्याप्रमाणे राऊत यांच्या झोळीत आली. मात्र चांदिवली विधानसभेत गेल्या २ दशकापासून आमदार असणारे काँग्रेसचे अरिफ (नसीम) खान आणि शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्यात झालेली लढत चुरशीची ठरली. सुरवातीपासून पाठशिवणीचा खेळ सुरु असणाऱ्या लढतीत अवघ्या ४०९ मतांनी २० वर्षाच्या सत्तेला मात देत लांडे यांनी चांदिवली विधानसभेच्या खुर्चीवर आपले नाव कोरले.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची हे आता तसं स्पष्ट असलं तरी या निकालाने राजकारणाची अनेक समीकरणं बदलली आहेत. काही दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे तर आयारामांचीही जनतेने गय केलेली नाही.
सर्वाधिक चुरस चांदिवलीत
२४ तारखेला घोषित होणाऱ्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष होते. राज्यातील काही मतदार संघात होणाऱ्या चुरशीच्या लढती पाहता सर्व महाराष्ट्राचे लक्ष या मतदार संघात विशेष होते. चांदिवली विधानसभा मतदार संघ हा सुद्धा त्यातील एक होता. मोदी लाटेत सुद्धा आपली छबी उमटवणाऱ्या काँग्रेसचे विद्यमान आमदार नसिम खान यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून दिलीप मामा लांडे मैदानात होते.
महाराष्ट्रातून सभांपासून दूर राहिलेल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींनी मात्र चांदीवलीच्या या लढतीत आपली सर्व ताकत लावली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार खुद्द राहुल गांधी यांनी येथे सभा घेत खान यांच्या विजयाचा विश्वास दर्शवला होता. दस्तुरखुद्द नसीम खान यांनी सुद्धा २० वर्ष या परिसरात केलेल्या कामाच्या आणि जनसंपर्काच्या बळावर ४ वेळा येथील मतदारांनी दर्शवलेला विश्वास पाहता यावेळी सुद्धा ते आपल्याच पारड्यात टाकत बहुमताने निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र या दोघांव्यतिरिक्त रिंगणात असणाऱ्या मनसेचे सुमीत बारसकर आणि वंचितचे अब्दुल खान यांनी घेतलेल्या मतांमुळे दिग्गजांचे अंदाजसुद्धा फसले.
उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसापासूनच दोघांनीही या मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढला होता. या जनसंपर्काच्या जोरावरच २१ तारखेला जनता आपल्याच पारड्यात मत टाकणार असा विश्वास दोघांनाही होता. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले होते. येथील माध्यमवर्गीय लोकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर हजेरी लावत आपले कर्तव्य बजावले होते. मात्र येथील इमारतीत राहणाऱ्या मतदारांनी मात्र याकडे पाठ फिरवली होती. दुपारी १२ पर्यंत १७.३३% मतदान झालेल्या या मतदार संघात दिवसभरात कसेबसे ५१.७४% मतदान झाले होते. या मतदार संघात २१८२२७ पुरुष मतदार तर १६१०४८ महिला मतदार असे एकूण ३७९२७९ मतदार आहेत. पैकी १९६२३१ मतदारांनी आपले मत नोंदवले होते.
२४ तारखेला झालेल्या मत मोजणीच्या पहिल्या फेरीपासून लांडे यांनी आघाडी घेतली होती. एखाद-दुसरी फेरी वगळता खान याना एकाही फेरीत मताधिक्य मिळू शकले नाही. शेवटच्या काही फेरीच्या काळात खान यांनी लांडे यांच्या मतांशी बरोबरी करत एका फेरीत ४९ मतांची आघाडी घेतली. अखेरच्या फेरीपर्यंत निकालाबाबत उत्सुकता वाढल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यानी मोठय़ा संख्येने मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली होती. दोघांच्यात सुरु असणाऱ्या पाठशिवणीचा खेळात पुढे काय होणार याच्या प्रतीक्षेत सर्व कार्यकर्ते असतानाच लांडे यांनी पुन्हा आघाडी घेत अवघ्या ४०९ मतांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीत खान यांना ८५,४७० तर लांडे यांना ८५,८७९ मते मिळाली. ह्यावर्षी आठ टक्क्यांनी वाढलेल्या मतदानासह वंचित बहुजन आघाडीच्या अबुल हसन खान यांनी नसिम खान यांच्या समर्थकांच्या मिळावलेल्या ८ हजार ८७६ मतांचा फायदा लांडे यांना झाला.
लांडे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ध्येय ठेवूनच सहा नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. या मतदारसंघासाठी निवडणुकीची तयारी सुरू असल्यापासूनच विद्यमान आमदार नसीम खान आणि दिलीप लांडे यांच्यात अक्षरश: शीतयुद्ध सुरू होते. दोघांमधील शीतयुद्धामुळेच ही निवडणूक दोन्ही बाजूने अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. ही चुरसच या मतमोजणीच्या वेळीही दिसून आली.
विक्रोळीतून सुनील राऊतांना जनादेश
विक्रोळी मतदार संघातून सुनील राऊत दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले होते. पाठीमागील पाच वर्षात त्यांनी या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला. मतदारांनी त्यांना या वेळीही विश्वास दाखवत विधानसभेत पाठवले. २०१४ मध्ये दिग्गजांचा पराभव करत गादीवर बसलेल्या राऊतांना ह्यावर्षी कोण टक्कर देणार याची उत्सुकता सर्वानाच होती. याचवेळी ३ वेळा नगरसेवक पदावर आपले नाव कोरलेले धनंजय (दादा) पिसाळ यांना राष्ट्रवादीतर्फे, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आणि मनसेचे विभागप्रमुख विनोद शिंदे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आल्यामुळे चौरंगी लढत बनली होती. मराठी मतदारांचा किल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात सुरवातीलाच एकवेळ मनसेने आपले वर्चस्व दाखवत मनसेचे मंगेश सांगळे हे आमदार बनले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी पाटील यांचा पराभव केला होता. मुंबईत आजच्या क्षणाला ७५ टक्के मराठी मतदार असलेला विक्रोळी हा एकमेव मतदारसंघ आहे.
२०१४च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेने मराठी मतदारांना आकर्षिक केले. २०१४ विधानसभा निवडणुकीत सुनील राऊत यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विक्रोळीतून निवडणूक लढवत मनसेच्या मंगेश सांगळे यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मैदानात असणारे माजी खासदार संजय दिना पाटील हे तिसऱ्या स्थानावर तर काँग्रेसचे संदेश म्हात्रे चौथ्या क्रमांकावर राहिले होते.
२०१९च्या निवडणुकीत राऊत यांनी पुन्हा जनादेश मिळवत ६२७९४ मते मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. धनंजय (दादा) पिसाळ याना ३४८८१, विनोद शिंदे याना १६००८ तर सिद्दार्थ मोकळे याना ९१२२ मते मिळाली.
No comments yet.