मिलिंदनगर येथे एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत धमकावून त्याच्या घरांपैकी एक घर किंवा २ लाख रुपये खंडणी मागितल्याबद्दल गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार अमीन मोमीन खान (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक कांबळे हे मिलिंदनगर येथे राहतात. २७ नोव्हेंबर रोजी ते आपल्या परिसरात असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास अमीन खान आणि त्याचा अजून एक साथीदार तिथे आले. आपल्या जवळील सुरा काढत तेरे भाईको पहुंचाया है, तुझे भी वही पहुंचाऊ क्या? अभी इधर ही डाल दुंगा, म्हणून धमकावले,” असे पवई पोलिस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले, “त्यानंतर अमीनने तुझ्या रूममधील एक रूम मला दे नाहीतर २ लाख रुपये दे, असे फिर्यादी यांना धमकावत खंडणी मागितल्याबद्दल आम्ही भादवि कलम ५०६ (२), ५०४, ३८५, ३४ नुसार गुन्हा नोंद करून अमिनचा शोध घेत होतो.”
अमीन हा बुधवारी दिंडोशी येथील न्यायालयात आला असताना आधीच सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेत पवई पोलिसांना सोपवले.
“पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात नोंद खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यात अमीनला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे,” असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लालासाहेब डाके यांनी सांगितले.
अटक आरोपी विरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात २ खून, ४ खंडणी आणि इतर असे एकूण १२ गुन्ह्यांची नोंद असल्याबाबत पवई पोलिसांनी सांगितले.
No comments yet.