पवईतील सर्वात जुनी इंग्रजी माध्यमातील शाळा पवई इंग्लिश हायस्कूलने यावर्षी आपली ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या आनंदाचा भाग म्हणून शुक्रवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात त्यांचा ४०वा वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव “झलक” मोठ्या उत्साहात पार पडला. दोन भागात झालेल्या या शालेय उत्सवात यावेळी छोट्या कलाकारांनी कलेचे विविध रंग उधळत सर्वांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर, अभिनेत्री आणि ये उन दिनों की बात हैं फेम आयेशा कडुस्कर, प्रसिद्ध गायक आणि स्टेज आर्टिस्ट श्रीकांत नारायण, शाळेच्या विश्वस्त मंजू शर्मा आणि पोद्दार जम्बो किड्सच्या डायना त्यागी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नोव्हेंबर ते जानेवारी म्हणजे शाळा कॉलेजेसच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस. १९७८ मध्ये चंद्रभान शर्मा यांनी एस आर पिल्लाई यांच्या नेतृत्वात सुरु केलेल्या पवई इंग्लिश हायस्कूलने नुकतीच ४० वर्ष पूर्ण केली आहेत. या आनंदाचा एक भाग म्हणून ४०वे वार्षिक स्नेहसंमेलन विशेष साजरे करण्याच्या उद्देशाने आखलेल्या आलेखात पालक आणि विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या कालिदास नाट्यगृहाने हा मोठ्या थाटात साजरा झाल्याची प्रचिती दिली.
दोन विभागात विभागलेल्या या कार्यक्रमात सकाळी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे पूर्व प्राथमिकच्या आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी डिझने, छोटा भिम, बार्बी डॉल आणि कार्टूनशी निगडित विविध गाण्यांवर आपली कला सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुरु असणाऱ्या वृक्षतोंडीवर भाष्य करणारे ‘ना काटो मुझे दुखता हैं’ या गाण्यावर मुलांनी सादर केलेले नृत्य. जे कलेच्या सादरीकरणातून प्रत्येकाच्या मनालाच चिरणारे ठरले. भारतीय सैनिक आणि सुरक्षा यंत्रणांवर सादर केलेल्या कलाकृतीने लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर अजून वाढवला तर विविध बॉलीवूड गाण्यांच्या नायकांना कार्टून कॅरॅक्टरच्या रूपात सादर करत विद्यार्थ्यांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्यसुद्धा फुलवले.
दुसऱ्या सत्रात दुपारनंतर माध्यमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बॉलीवूड थीमने तर उपस्थित पालक आणि शिक्षकांना ठेका धरायला भाग पाडले. विद्यार्थ्यांच्या या उत्साहात अजून रंगत तर तेव्हा आली जेव्हा येथे सादर होत असणाऱ्या काही गाण्यांच्या वेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या तालात ताल मिसळत नृत्य करून हर्षोल्हास साजरा केला.
कार्यक्रमाची सांगता करताना बॉलीवूडचे डान्स हिट मल्हारी आणि मराठी चित्रपट सैराटचे हिंदी रिमेक धडक सह विविध गाण्यांवर कोरिओग्राफरसह नृत्य करत सर्व मुलांनी स्टेज हलवून टाकले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेच्या तिन्ही मुख्याध्यापिका शिरले उदयकुमार, भावना मांगो आणि लता प्रसाद पिल्लाई सह शिक्षक आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments yet.