विद्यार्थ्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून, ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली.
भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पोर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून पवई इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी पवई तलाव किनाऱ्यावरील वृक्षांना राख्या बांधत, वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी यावेळी प्रार्थना केली.
शाळेच्या संस्थापिका मंजू शर्मा, मुख्याध्यापिका शरली पिल्लाई आणि शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळा उपक्रम राबवून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, पालिका शिक्षण विभागाचे राठोड उपस्थित होते.
“चला चला रे गड्यांनो रानात जावू, हिरव्या दोस्ताला जवळून पाहू. जंगल झाडे तोडू नका, निसर्ग राजाला दुखवू नका” हे शाळेचे संगीत शिक्षक खोत सर यांनी रचलेले गाणे गात मुलांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडून ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणुन वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखून पवई इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून, निसर्ग संवर्धनाचा संदेश देत यावर्षीचा रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला हानीकारक असणाऱ्या घटकांना वगळत स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर करुन वृक्षाबंधन केले.
यावेळी परिसरात साफसफाई करत विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. हा उपक्रम केवळ औपचारिकता नसून, वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षिततेची खात्री करून, वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा चिमुकल्यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments yet.