हिरानंदानी, पवई प्लाझा येथे गोल्डन फार्म नामक कार्यालय थाटून मुंबईकरांना स्वस्तात प्लॉट मिळवून देतो असे सांगून, दीड करोड घेवून पसार झालेल्या महाठग संदीप जाधव याला पवई पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ आणि टिमने ४ वर्षानंतर मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मुंबई, कल्याणसह पुण्यातही याच्यावर गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पवई पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.
रायगड, पांचगणी येथे त्याच्या मालकीच्या असणाऱ्या २०० एकर जमिनीच्या भागात प्लॉट देतो सांगून ८० पेक्षा जास्त लोकांना जाधवने चुना लावला होता. यात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१२ साली संदीप जाधव याने हिरानंदानी, पवई प्लाझा येथे “गोल्डन फार्म” या नावाने रिअल इस्टेटचे कार्यालय थाटले होते. विविध माध्यमातून त्याने पांचगणी, रायगड भागात स्वस्तात प्लॉट देण्याची जाहिरातबाजी केली होती. याच जाहिरातबाजीला भुलून अनेक मुंबईकरांनी प्लॉट मिळवण्यासाठी त्याच्याजवळ प्लॉटची बुकिंग केली होती. मात्र २०१४ साली प्लॉटचा ताबा देण्याच्या वेळेस त्याने आपले येथील कार्यालय बंद करून पळ काढत सर्व संपर्क तोडला होता.
अनेक मुंबईकरांनी २ लाख, ३ लाख, ६ लाख अशी अनामत रक्कम भरून येथे प्लॉट बुक केले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच या संदर्भात जवळपास ४० – ५० लोकांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंद केला होता. याचा तपास करताना पवई पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती, मात्र याचा मुख्य सूत्रधार जाधव पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
‘लोकांना त्याच्या राहणीमानातून आणि वागण्यातून तो कोणीतरी मोठा जमीन मालक असावा असे भासावे म्हणून जाधव आपल्या परिवारासह ४ वर्ष लेकहोम भागात मोठ्या भाड्याच्या घरात राहत होता.’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले ‘त्याने भांडूप येथे मातोश्री बिल्डर, टिटवाळा येथे मंगलमुर्ती होम नावाने असाच व्यवसाय सुरु करून अजून काही लोकांना फसवले असल्याचे तपासात पुढे आले आहे. या सोबत त्याच्या परिवारातील अजूनही कोणी सोबत होते का याचा आम्ही तपास करत आहोत.’
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ, पोलीस शिपाई वर्देकर यांचे एक पथक तयार करून तपास सुरु होता.
‘आम्हाला आमच्या एका खास खबऱ्याने जाधव हा नवीन पनवेल भागात अजून काही लोकांना फसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. ज्याच्या आधारावर पाठीमागील दोन महिन्यांपासून आम्ही सोशल माध्यमातून त्याच्यावर नजर ठेवून होतो’ असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ यांनी सांगितले.
जाधव याला भादवि कलम ४०६, ४२०, ३४ नुसार नोंद गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.