पोलीस शिपायाला जखमी करणाऱ्या दोन स्टंट बाइकर्सना अटक

पवई तलाव भागात स्टंट करत असणाऱ्या बाइकर्सना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला जखमी करणाऱ्या दोन स्टंट बाइकर्सना पवई पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पोलीस हवालदार धर्मा डेंगळे गंभीर जखमी झाले आहेत. साहिल गोसावी (वय १९) आणि शुभम लाखत (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या या दोन तरुणांची नावे आहेत.

तरुणाईमध्ये वेगाने गाडी चालवणे, मोटारसायकलवर स्टंट करणे याचे मोठे क्रेज सध्या निर्माण झाले आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सध्या रस्त्यांवर आपल्या मोटारसायकलीवरून स्टंट करताना पहायला मिळतात. अनेक ठिकाणी अक्षरशः दोन-तीन तरुण मोटारसायकलवर बसून स्टंट करताना आढळून येतात. पवईतील हिरानंदानी, पवई तलाव या भागात तर या स्टंट बाईकर्सनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. या सोबतच मोटारसायकल आणि कारचे सायलेंसर बदलून चित्रविचित्र आवाज करत सुद्धा हे तरुण संपूर्ण परिसरातून फिरत असतात. मात्र त्यांच्या या कृत्यामुळे ते स्वतःचाच नाही तर इतरांचा जीवही धोक्यात घालत असतात. अशीच एक घटना मंगळवारी पवई परिसरात घडली.

नियमित प्रमाणे संध्याकाळी पवई परिसरात गस्तीवर निघालेल्या पवई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार डेंगळे यांना काही तरुण गणेशनगर विसर्जन घाट या भागात मोटारसायकलवर स्टंट करत असल्याचे दिसून आले. त्यांना रोखण्यासाठी ते तिकडे निघालेले असतानाच त्यांना पाहून तेथे स्टंट करत असणाऱ्या तरुणांची एकच तारांबळ उडाली.

https://www.facebook.com/alinasalonpowaii

“धावपळीच्या नादात दोन तरुणांनी सरळ त्यांच्या अंगावरच गाडी घातल्याने ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले. पवई पोलीस ठाण्यातच कार्यरत असणारे पोलीस शिपाई अशोक परब यांनी हे सगळे बघताच धावत जावून त्यांनी पोलीस हवालदाराची मदत करत दोन्ही तरुणांना त्यांच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पवई रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, ६ टाके पडले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

भादवि कलम ३५३, २७९, ३३७, ३४ सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करून, दोन्ही तरुणांना अटक करून कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!