पवई पोलीस ठाणे हद्दीत लोकांचे मोबाईल हिसकावून, चोरी करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२ सह ३४च्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. युनूस सैफन शेख (वय ३२ वर्ष) आणि प्रदीप गौतम शिरवाले (वय ३५ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी नामे रियाझ इरफान अहमद (२१) हे ३ ऑक्टोबरला सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास आपल्या कामासाठी निघाले होते. “ते एल अँड टी गेट नं ३ समोर उभे असताना एका पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम तेथे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या एका तरुणाने त्यांचा हातातील मोबाईल हिसकावून घेत जबरीने चोरी केला होता,” असे पोलीसांनी सांगितलं.
गुन्हे प्रकटीकरण पथक सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना चांदिवली फार्म रोड येथे एक पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा मोटार सायकलवरून तीन इसम संशयितरित्या फिरताना आढळून आले. “त्यांचा आमच्या पथकाने पाठलाग करून चांदिवली डी मार्ट येथे दोन इसमांना ताब्यात घेतले, एक इसम बाईकवरून पळून गेला. सदर दोन्ही इसमांना पोलीस ठाणेस आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांचा पवई, साकीनाका परिसरातील विविध जबरी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील यांनी सांगितले.
अटक आरोपींकडून पोलिसांनी एकूण ५ मोबाईल हस्तगत केले असून, यातील एक मोबाईल त्यांनी साकीनाका पोलीस ठाणे, १ मोबाईल एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याबाबत माहिती दिली. अटक आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून, युनुस शेख याच्यावर १५, तर प्रदीप याच्याविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे.
सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई पोलीस ठाणे बुधन सावंत, पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक झेंडे, जाधव, सुरवाडे, पोलीस शि. राठोड यांच्या पथकाने केला.
No comments yet.