पवईला प्लास्टिक फ्री करण्यासाठी पवईतील हिरानंदानीमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, परिसरात ‘प्लास्टिक फ्री पवई’ मोहीम राबवत आहेत. लोकांनी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी ते परिसरात गेल्या महिनाभरापासून जनजागृती करत आहेत.
मुंबईतील हिरानंदानी फाऊन्डेशन स्कूल, ओबेरॉय स्कूल, इकोलेमोन्डेले स्कूल, एस. एम. शेट्टी स्कूल अशा नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या श्लोक बाबू, वेदांत मनावत, अनिष पाटील, प्रणव एरेजंटी, एस. एम. विक्रम गौतम अनिल या सहा विद्यार्थी मित्रांनी आपल्या शाळेला असणाऱ्या सुट्यांचा पुरेपूर फायदा घेत पवईला प्लास्टिक फ्री करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
“पर्यावरणाच्या ऱ्हासामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा मोठा वाटा आहे. या ऱ्हासाला रोखण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृती करताना आम्हाला आपल्यापासूनच सुरुवात करणे आवश्यक आहे. माझी ही संकल्पना मी माझ्या मित्रांना सांगताच त्यांनी सुद्धा यात सहभाग घ्यायचे ठरवले. हिरानंदानीतून याची सुरुवात करत संपूर्ण जून महिना येथील स्थानिक नागरिकांमध्ये आणि दुकानदारांना प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि कागदी पिशव्यांच्या वापराबाबतचे फायदे याबाबत आम्ही जनजागृती केली” असे आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना श्लोक बाबू याने सांगितले.
पवईतील जवळपास १२०० घरांना विद्यार्थ्यांनी भेटी देवून ‘प्लास्टिक फ्री पवई’ आणि वृत्तपत्र रद्दी जमा करण्याच्या उपक्रमाबद्दल जनजागृती केली आहे. अनेक सोसायटीमध्ये त्यांनी पत्रके वाटून सुद्धा याबाबत जनजागृती केली आहे.
“दुकानदारांशी बोलताना त्यांनी आम्हाला दिलेले कारण आम्हाला थक्क करणारे होते. कागदी पिशव्या बनवणारे कारखाने जास्त नफा मिळवण्यासाठी त्या पिशव्या जास्त किमतीत देत असल्याने, दुकानदार त्याचा वापर टाळून स्वस्तात मिळणाऱ्या प्लास्टिक पिशव्याचा वापर करणे सोयीस्कर मानतात. आम्ही महिला बचतगटाच्या माध्यमातून या पिशव्या बनवून घेवून ५० पैसे ते ४ रुपये किमतीच्या पिशव्या या दुकानदारांना उपलब्ध करून देत आहोत,” असे याबाबत बोलताना या विद्यार्थी ग्रुपने सांगितले.
हिरानंदानीतील एव्हेलॉन आणि इव्हिटा इमारतीमधील रहिवाशांकडून वृत्तपत्रांची रद्दी जमा करून बांद्रा येथील श्री महालक्ष्मी महिला मंडळाकडून ४०० कागदी पिशव्या बनवून घेण्याची ऑर्डर देत आता पवईतील दुकानदारांना ते प्लास्टिक पिशव्यांच्या भावात उपलब्ध करून देत आहेत.
“आमच्या या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिसरातील काही भाजीवाले, फुलवाले आणि दुकानदार यांच्याशी आमचे बोलणे झाले असून, कागदी पिशव्यांच्या वापरासाठी त्यांनी होकार दिला आहे” असे याबाबत बोलताना बाबू याने सांगितले.
जास्तीत जास्त पवईकरांनी विशेषतः तरुणांनी पर्यावरण संवर्धनासाठी ‘प्लास्टिक फ्री पवई’ उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सुद्धा या ग्रुपकडून करण्यात आले आहे.
No comments yet.