चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारतीजवळ एक खाजगी बस जळाल्याची घटना आज सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बसचा वाहक प्रकाश राजकरण (२२) आग विझवण्याच्या धडपडीत किरकोळ जखमी झाला आहे.
येथील चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारत आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांना घेऊन येणाऱ्या खाजगी बसेस पैकी काही बसेस येथेच रस्त्याच्या किनाऱ्याला उभ्या केल्या जातात. आज (सोमवारी) चिराग ट्रॅव्हल्सची अशीच एक बस क्रमांक एमएच ०४ एचवाय ६५८६ ही येथील रेनॉल्ट शोरूमच्या समोरील भागात उभी केली होती.
सकाळी ११. १५ वाजण्याच्या सुमारास याच्या वाहक प्रकाशला गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे आढळून आले. नक्की काय झाले आहे पाहण्यासाठी इंजिन भागाचा दरवाजा उघडताच दाबून बसलेली वाफ बाहेर फेकली गेल्याने प्रकाश वाफ लागून किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर राजावाडी येथे उपचार करून सोडण्यात आले आहे.
‘फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्यात आली असून, प्रथम दर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.