साकीनाका ९० फीट रोड येथील सेठीया नगरच्या एका घरातून २० मार्चला ९ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेवून पसार झालेल्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी ७२ तासाच्या आत वाराणसी, उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. इस्माईल इसाक शेख (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत अशोक भानुशाली यांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या उपचारासाठी जमा केलेली रक्कम शेख याने चोरी करून उत्तरप्रदेशला पळ काढला होता. त्याच्याकडून पोलिसांनी ५.३ लाख रुपये रोकड, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
पिडीत भानुशाली यांचे साकीनाका भागात एक जनरल स्टोअर आहे. आपल्या मुलाच्या उपचारासाठी पाठीमागील ३ वर्षापासून ते पैसे जमा करत होते. या चोरीमुळे त्यांना चांगलाच धक्का बसला होता. ‘पोलिसांनी त्वरित तपासाला लागत आरोपीला अटक करून त्यातील बरीच रक्कम हस्तगत केल्यामुळे मला थोडा आधार मिळाला आहे. यातील काही रक्कम मी पाठीमागील तीन वर्षापासून साठवली आहे. काही रक्कम माझ्या मित्रांकडून उधारीवर घेतलेली आहे’ असे याबाबत बोलताना भानुशाली यांनी सांगितले.
उपचारासाठी लागणारी अधिक रकमेच्या सोयीसाठी भानुशाली आपल्या पत्नी आणि मुलासह २० मार्चला आपल्या गावी भूज येथे जाण्यास निघाले होते. २१ मार्चला त्यांच्या दुकानाच्या शेजाऱ्याने त्यांच्या दुकानाचे शटर तुटलेले पाहून साकीनाका पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर साकीनाका पोलिसांनी भानुशाली यांना याबाबत कळवले होते. ‘माहिती मिळाली तेव्हा मी गोथम गुजरात येथे होतो. २१ मार्चला माहिती मिळताच मी त्वरित मुंबईकडे परतीचा प्रवास करत दुसऱ्या दिवशी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला,’ असेही भानुशाली यांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) नविनचंद्र रेड्डी यांनी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत, पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस निरीक्षक प्रवीण माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंखे आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांची एक टिम तयार करून तपास सुरु केला होता. चोरीच्या काळात सेठियानगर भागात टेहाळणी करणाऱ्या खान याला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ओळखण्यात आले.
‘रोख आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्यानंतर शेख वाशीला जावून लपला आणि दुसऱ्या दिवशी त्याने उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे आपले घर गाठले. उत्तरप्रदेशमध्ये पोहोचल्यावर शेखने चोरीच्या पैशातून तीन सोन्याच्या अंगठ्या आणि मोबाइल विकत घेतला’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
पोलीस रेकॉर्डमध्ये शेखचा आधीच्या गुन्ह्याचा रेकॉर्ड मिळून आल्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून त्याच्या मूळ गावी वाराणसी येथे पाठवले. पोलिसांना पाहून धावपळ करणाऱ्या शेखला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून २५ मार्चला मुंबईला आणले.
शेखला भारतीय दंड विधायक कायदा, कलम ३८० (चोरी), ५५४ आणि ४५७ (गुन्ह्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी भानुसाली यांना चोरी झालेल्या मालमत्ते पैकी हस्तगत मालमत्तेची परतफेड करण्यास परवानगी मिळावी म्हणून न्यायालयाकडे जाण्यास सांगितले आहे.
No comments yet.