साकीनाका येथील एका व्यापाऱ्यास पालिकेत तक्रार करून कारवाईची धमकी देवून दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धमकी देवून खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना साकीनाका पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुदाम साहिल आणि अनिल शुक्ला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी यांचा साकीनाका परिसरात कपड्यांना रंग आणि ड्राय क्लीनिंग करण्याचा व्यवसाय आहे. व्यापाऱ्याकडे काही लोकांनी संपर्क साधत आपली ओळख पत्रकार असल्याची करून दिली होती. तुमच्या हा व्यवसाय विनापरवाना असल्याची तक्रार पालिकेत देऊन कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिली. याबाबत पालिकेत तक्रार करू नये आणि कारवाई होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर दीड लाख रुपये देऊन विषय संपवावा असे या तिघांनी व्यावसायिकाला सांगितले.
“ठरलेल्या दीड लाखापैकी १२ हजार रुपयांची खंडणी या आरोपींनी आधीच घेतली होती. शुक्रवारी उरलेली रक्कम पैकी ५० हजार घेण्यांसाठी आरोपी येणार असल्याची तक्रार फिर्यादी यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात केली होती,” असे पोलिसांनी सांगितले.
“उरलेली रक्कम घेण्यासाठी साकीनाका परिसरात हे तिघे इसम आले असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडून अटक केली आहे,” असे पोलीस उपायुक्त (परीमंडळ १०) महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
आरोपीचे इतर काही साथीदार या गुन्ह्यात सहभागी असल्याची पोलिसांना शंका असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
No comments yet.