बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स कंपनी बनवून मुंबईकरांच्या मौल्यवान वस्तू आणि गाड्या लांबवणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पाठीमागील महिन्यात पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे पाठवलेल्या एसयुव्ही कारसह ३३.८ हजाराला गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पवई पोलीस करत होते. मूळचे हरियाणातील असणारे रामकुमार शर्मा (२३) आणि विकास शर्मा (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कळंबोली येथून पवई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
“अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स” या बनावट नावाने ते हा गुन्हेगारीचा व्यवसाय चालवत. ज्याच्या दिलेल्या पत्यांवर त्यांचे कोणतेच कार्यालये नाहीत. अशाच प्रकारे मुंबईतील अनेक लोकांना गंडा घालणाऱ्या या टोळीतील दोन मुख्य सुत्रदारांचा पवई पोलीस शोध घेत आहेत.
पवई पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून तीन वाहने आणि काही बनावट कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
“हस्तगत वाहनांपैकी एक वाहन हे विंटेज वाहन आहे. हस्तगत करण्यात आलेली वाहने ही पवई, साकीनाका आणि कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल गुह्यातील आहेत. ऑनलाईन नोंद टाकलेल्या या बनावट मूव्हर्स अँड पॅकर्सची खात्री करून न-घेतल्यामुळेच हे रॅकेट ऑनलाइन फसवणूक करण्यात यशस्वी ठरू शकले आहे. त्यांनी अशा प्रकारे अनेक मुंबईकरांची फसवणूक केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असे पोलिसांनी सांगितले.
पवई प्रकरण
आपल्या पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे स्कोर्पिओ जीप पाठवण्यासाठी पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या ३४ वर्षीय पत्नीने अशी सुविधा देणाऱ्या लोकांच्या बाबतीत ऑनलाईन माहिती पाहिली असताना “अग्रवाल ऑल इंडिया मूव्हर्स अँड पॅकर्स”ची माहिती त्यांना मिळाली. १८ फेब्रुवारीला त्यांनी मूव्हर्स अँड पॅकर्सच्या (७२१०००२४००/७०१०००२७००) नंबरवर संपर्क साधून आपल्याला एक गाडी मिझोरम येथे पाठवायची असल्याचे सांगितले.
‘पिडीत आणि तिचा पती मुंबईच्या बाहेर असताना त्यांना त्या बनावट मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीकडून फोन आला होता. फोनवर त्यांनी त्यांची दोन माणसे येवून गाडी पाठवण्याची कागदोपत्री पूर्तता करून गाडी ताब्यात घेतील अशी माहिती दिली. त्या दोन माणसांनी गाडी गुवाहाटी येथे पोहचायला सहा ते सात दिवस लागतील अशी माहिती दिली होती’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
२३ फेब्रुवारीला मूव्हर्स अँड पॅकर्सच्या खात्यात गाडी पोहचवण्याचा मोबदला म्हणून अधिकाऱ्याने ३३८०६ रुपये आपल्या दिल्ली येथील खात्यातून जमा केले.
गाडी घेवून जाताना कंसाइंटमेंट डिलिव्हरी इनव्हॉइस सुद्धा देण्यात आले होते. मात्र, मार्च १० पर्यंत गाडी निर्धारित ठिकाणी पोहचली नसल्याने महिलेने चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता काहीच माहिती मिळून आली नसल्याने तिने पवई पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता.
‘आम्ही गुन्ह्याचा तपास करत असताना कळंबोली भागातून याच नावाने एक कंपनी कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. टेक्निकल सर्वेलंस ठेवून माहिती मिळवून आम्ही यातील दोन आरोपींना तेथून अटक केली आहे’ असे याबाबत बोलताना एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
No comments yet.