पूर्वी शाळा, कॉलेज आणि खेळाच्या मैदानावर मित्र भेटण्याची जागा आता सोशल माध्यमांनी घेतली आहे. समोर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा दूरवर कुठेतरी बसलेल्या अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करणे लोक जास्त पसंत करू लागलेत. याचाच फायदा घेत पाठीमागील काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मैत्री जुळवणाऱ्या सोशल माध्यमात अनोळखी तरुणीशी मैत्री करणे साकीनाका येथील तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या अनोळखी मैत्रिणीने लंडनवरून भेटवस्तू पाठवल्याचे सांगून वेगवेगळी कारणांनी त्याच्याकडून सव्वा लाख रुपये उकळले.
साकीनाका येथे राहणारा सचिन मोठे (बदललेले नाव) या तरुणाला मैत्री जुळवणाऱ्या साईटवर विकी रोझ या तरुणीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाली होती. त्या तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली तेव्हा ती ब्राझील येथील असून, पाठीमागील काही वर्षांपासून लंडन येथे राहत असल्याचे तिने सांगितले. आपल्या आईवडिलांचे निधन झाले असून, ब्राझीलमधील जागेवरून काकांबरोबर वाद सुरू असल्याने न्यायालयात खटला सुरू आहे, असेही रोझने तरुणाला सांगितले होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु झालेली मैत्री पुढे व्हाट्सअॅपवर येवून पोहचली.
काही दिवसांनंतर जागेचा खटला आपण जिंकल्याने खूप खूष असून, तुझ्या आधारामुळेच हे शक्य झाल्याचे सांगत भेटवस्तू पाठवत असल्याचे रोझने सांगितले. मोबाइल, बूट, घड्याळ आणि कपडे यांचे फोटोही तिने व्हाट्सअॅपवर पाठवले. यानंतर दोन दिवसांनी तिचा फोन आला आणि तिने या पार्सलसाठी वकील खान याच्या नावावर २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. असे तरुणाने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
‘पैसे पाठवूनही बरेच दिवस पार्सल न मिळाल्याने तरुणाने रोझ हिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पार्सल विमानतळावर अडकले असल्याचे तिने सांगितले. ज्यानंतर एक फोन आला आणि आपणास आलेली भेटवस्तू फारच महागडी असून, त्यासाठी अजून एक लाख भरावे लागतील असे तरुणाला सांगितले’ असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
तरुणाने एक लाख रुपये सुद्धा हस्तांतरित केल्यानंतर त्याला आणखी एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने मुंबई विमानतळावरून बोलत असून, विमानतळावरील स्कॅनिंगमध्ये पार्सलमध्ये वस्तूबरोबर काही डॉलर असल्याचे दिसून आले आहे. त्यावरील कर दोन लाख भरून आपण हे पार्सल ताब्यात घ्यावे असे तरुणाला सांगण्यात आले. शहानिशा करण्यासाठी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही रोझचा काहीच संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तरुणाने साकीनाका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली.
भादवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.