मुंबई उपनगरातील साकीनाका परिसरात मेफेड्रोन नामक अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
तरुणाई नशेच्या विळख्यात अडकून अनेक कुटुंबातील तरुण पिढी अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी शहरात छुप्या मार्गाने होणाऱ्या नशेखोरीला रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई यांचेकडुन विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
या अनुषंगाने तपास सुरु असतानाच अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटच्या पथकाला साकीनाका परिसरात काही इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारे ३१ मे रोजी साकीनाका परिसरात सापळा रचण्यात आला होता. “आम्ही परिसरात पाळत ठेवून असताना दोन इसम संशयास्पद रीतीने हालचाली करत असल्याचे आढळून आले. त्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ मेफेड्रोन अंमली पदार्थ मिळून आला,” असे अं.प.वि. कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांचे ताब्यातून पोलिसांनी ६० ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम. डी) अंमली पदार्थ ज्याची एकूण किंमत १२ लाख रुपये एवढी आहे जप्त केला आहे. नमूद अटक आरोपींविरूध्द कलम ८ (क) सह २२ (क), २९ एन.डी.पी.एस. ऍक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अटक आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीना ४ जून पर्यंत मा.न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नमूद गुन्हयाचा पुढील तपास बांद्रा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय फाळके करत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा) शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा) राजेंद्र शिरतोडे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत बांद्रा युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांचे नेतृत्वात बांद्रा अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केली आहे.
No comments yet.