पवई हिरानंदानी येथील ओडिसी इमारतीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाची ३५ लाखाची महागडी कार चोरून पसार झालेल्या चोरट्याला त्याच्या साथीदारासह पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकाने गाडी साफ करण्यासाठी पाठवले असल्याचा बहाणा करून चावी घेवून त्याने कार इमारतीच्या पार्किंगमधून पळवून नेली होती.
शिवाजी भाऊ झोरे आणि प्रदीप भागोजी गावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील प्रदीप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
प्रवीण भाटीया हे व्यावसायिक आपल्या परिवारासह पवई, हिरानंदानीतील ओडिसी या उच्चभ्रू इमारतीत राहतात. त्यांच्या जवळ ३५ लाख किमतीची महागडी फोर्चुनर एसयुव्ही कार आहे. या कारच्या साफसफाईसाठी कोणी माणूस असल्याच सांगण्यास त्यांनी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाजवळ सांगितले होते.
’२३ मार्चला सकाळी एका व्यक्तीने त्यांच्या घरी जावून, मला पांडे वॉचमनने पाठवले आहे तुमच्या गाडीच्या साफसफाईसाठी गाडीची चावी द्या असे सांगितले. घरात असणाऱ्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवत गाडीची चावी त्याला सुपूर्द केली’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांचा मुलगा काही वेळाने खेळण्यासाठी खाली आला असता आपली गाडी पार्किंगमध्ये नसल्याचे त्याच्या निदर्शनास येताच त्याने घरी याबाबत माहिती दिली. भाटीया यांनी याबाबत खात्री केली असता खरच गाडी गायब होती. वॉचमनने सुद्धा त्याने अशा कोणत्याच व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवले नसल्याचे सांगितले.
‘तक्रारदार यांनी पवई पोलीस ठाण्यात येवून याबाबत तक्रार दाखल करताच आम्ही इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन व्यक्ती सदर कार घेवून जाताना आढळून आले होते. त्यांच्या बाबत चौकशी सुरु असताना एका ड्रायव्हरने दोन इसमापैकी एक आठवडा भरापासून येथे टेहळणी करत असल्याची माहिती दिली’, असे पोलिसांनी सांगितले.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड, पोलीस हवालदार राजाराम कुंभार, पोलीस नाईक संतोष देसाई, पोलीस नाईक वर्देकर, पोलीस नाईक मोहोळ, पोलीस शिपाई देशमुख, पोलीस शिपाई सचिन गलांडे, पोलीस शिपाई अशोक परब पथक यांचे पथक बनवून तपास सुरु केला होता.
‘टेक्निकल सर्विलांसच्या आधारावर आम्हाला पाहिजे आरोपी दिवा भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या आधारावर माहिती मिळवत आम्ही प्रदीप गावडे आणि शिवाजी झोरे याला अटक केली आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
गुन्ह्यात चोरीला गेलेली फोर्चुनर एसयुव्ही कार हस्तगत करण्यात आल्याची माहिती याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.
अटक आरोपीं पैकी प्रदीप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, सांताक्रूझ, पार्कसाईट, गोवंडी आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
‘मुंबई, महाराष्ट्रातून महागड्या गाड्या चोरी करून इतर राष्ट्रात विकणारी टोळी शहरांमध्ये कार्यरत आहे. विशेषतः निवडणुकांच्या काळात अशा चोरींच्या गाड्यांचा सरास वापर केला जात असतो, अटक दोन्ही आरोपींचा अशा टोळीशी काही संबंध आहे का याचाही आम्ही शोध घेत आहोत’, असेही पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
No comments yet.