पवईतील जयभीमनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पवई तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न काल सकाळी येथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे फसला. सविता जाणकार (४०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सध्या जोगेश्वरी येथील ट्रोमा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पवई तलावात वाढत्या घुसखोरीला रोखण्यासाठी सध्या तलावाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट अंग्लिंग असोसिएशनचे गस्त पथक नजर ठेवून असताना सुरक्षारक्षक इम्तियाज खान याला एक महिला पवई तलावात उडी मारताना दिसली. त्वरित बोट आणि काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिकडे धाव घेत त्याने महिलेला बाहेर काढले.
“आम्ही महिलेला बाहेर काढताच त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. महिला आत्महत्येच्या ठिकाणापर्यंत कशी पोहचली हे मात्र गूढ आहे” असे यावेळी बोलताना खान याने सांगितले.
महिलेवर सध्या जोगेश्वरी येथील ट्रोमा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
“महिला पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे, तिच्या आत्महत्येच्या मागचे कारण अजून समजू शकलेले नाही. मानसिक तणावात तिने हे पाऊल उचलले असावे असे प्रथमदर्शनी समोर येत आहे”, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.