डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यावर्षी साजऱ्या होणाऱ्या १२६ व्या जयंतीनिमित्त बौद्ध धम्माचा दिप तेवत ठेवणाऱ्या धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आयआयटी मार्केट भागात संस्थेतर्फे ‘भिमस्पंदन’ या प्रबोधनपर संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते.
१४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची (१२६ वी) जयंती मोठ्या उत्साहात देशभर साजरी होत असताना, बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेवून जाणाऱ्या धम्मदीप तर्फे यादिवशी पवईतील सर्व विहारांना भेट देवून वंदना आणि प्रबोधनात्मक विचारांची देवाण-घेवाण करून बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी केली. सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येत यात घेतलेला सहभाग हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
याचाच उत्तरार्ध म्हणून संस्थेतर्फे लोकांच्यात जनजागृती आणि बाबासाहेबांचे विचार रुजवण्यासाठी ‘भिमस्पंदन’ ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून प्रबोधनपर संगीत रजनीचे आयोजन केले होते. प्रविण ढोणे, शिरीष पवार आणि टिमच्या सुरातून बाबासाहेबांचे विचार यावेळी लोकांच्या समोर मांडण्यात आले.
यावेळी पवईसाठी लाभलेल्या सर्व नगरसेवकांसह विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवर चालणाऱ्या विविध समाजातील लोकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान सुद्धा करण्यात आला.
“डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच कोण्या एका समाजाला समोर ठेवून कार्य केले नाही, मग ते कोण्या एका समाजाचे कसे असतील? ते सगळ्या देशाचे आहेत. सर्वांनी मिळून केवळ त्यांची जयंती किंवा महापरिनिर्वाण दिनच नव्हे तर प्रत्येक दिवस हा त्यांच्या विचारांचा दिवस म्हणून साजरा करायला हवा. ठराविक समाजातील लोकांनीच हे दिवस साजरे करायचे या प्रथेला बाजूला सारत धम्मदीपने समाजातील सर्व जाती-धर्म-पंत आणि स्तरातील लोकांना एकत्रित करून आंबेडकरांच्या विचारांचे उत्सव साजरे करायला सुरुवात केली आहे. सर्वाना सोबत घेवून प्रबोधनात्मक असे कार्यक्रम आम्ही प्रत्येकवेळी राबवत असतो. बाबासाहेबांचे विचार हे घराघरात पोहचले पाहिजेत तरच एक प्रगल्भ भारत निर्माण होईल,” असे यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र धिवार यांनी सांगितले.
No comments yet.