बसमधील बेवारस बॉक्सने पवई हादरली

छायाचित्र: ऑलीव डिसुझा

काल संध्याकाळी अंधेरीच्या दिशेने जाणारी बस मार्ग क्रमांक ४०३ पवईमध्ये असताना, बसच्या कंडक्टरला बसमध्ये पाठीमागील सीटजवळ एक बेवारस बॉक्स आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्वरित बस रिकामी करण्यात आली. बस निर्जन स्थळी घेवून जावून बॉंब स्कोडला पाचारण करून बॉक्स ताब्यात घेण्यात आला.

मुलुंड ते आगरकर चौक (अंधेरी) या मार्गावर चालणारी बस क्रमांक ४०३ काल नेहमीप्रमाणे आपल्या फेरीसाठी निघाली. प्रवाशांना तिकीट देण्यात व्यस्त असलेल्या कंडक्टरला बस पवईजवळ आल्यावर एक बॉक्स पाठीमागील सीटच्या भागात असल्याचे दिसले. तो कोणाचा आहे याबाबत प्रवाशांजवळ त्यांनी चौकशी केली, मात्र संपूर्ण बसमध्ये कोणीच त्याचे मालकत्व स्विकारत नसल्याने हा घातपाताचा प्रकार तर नाही असा संशय घेत गाडी त्वरित बाजूला लावत पोलिसांना याची खबर देण्यात आली.

“माहिती मिळताच संपूर्ण परिसर आणि बस रिकामी करण्यात आली. बसला निर्जनस्थळी घेवून जावून सर्विस रोडवरील वाहतूक रोखण्यात आली आणि बॉंब स्कोडला पाचारण करून सदर बॉक्स ताब्यात घेण्यात आला” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे यांनी सांगितले.

वाहूतक व्यवस्था रोखताच आणि परिसर रिकामा करताच नेहमीप्रमाणे बॉंब असल्याची खबर सोशल मिडिया आणि फोनाफोनीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात झाली. आपला परिवार सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यासाठी पवईतून बाहेर असणाऱ्या अनेक पवईकरांनी घराकडे धाव घेतली. या बातमीने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.

“बॉंब स्कोडने बॉक्स ताब्यात घेवून त्याची पाहणी केली असता बॉक्समध्ये ‘कोणा’ कंपनीचे ईलेक्ट्रीकचे स्विचेस असल्याचे आढळून आले आहे. बॉंब किंवा बॉंब सदृश्य अशी कोणतीच गोष्ट मिळून आली नाही” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक घावटे यांनी सांगितले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!