दुर्गादेवी शर्मा उद्यानाची दुर्दशा, पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

लहान मुलांसहित जेष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय

रविराज शिंदे

पवईतील चैतन्यनगर परिसरात नागरिकांसाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी पालिकेकडून दुर्गादेवी शर्मा उद्यान बनवण्यात आले आहे, मात्र या उद्यानाची पाठीमागील काही वर्षापासून प्रचंड प्रमाणात दुर्दशा झाली आहे. उद्यानातील बसण्याची आसने, बाकडे, यांच्यासह लहान मुलांच्या खेळण्याच्या साधनांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे हे उद्यान लहान मुलांसाठी खेळायला सोडाच नागरिकांना बसण्यासाठी देखील व्यवस्थित अवस्थेत उरलेलेल नसल्याने येथील स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रमेश कांबळे यांनी पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करत सदर बाब लक्षात आणून दिली असतानाही पालिकेने या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे .

५ वर्षापूर्वी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेकडून आकर्षित असे दुर्गादेवी शर्मा उद्यान बनवण्यात आले होते. या उद्यानाचा उद्घाटन समारंभ ही दिमाखदार पद्धतीने कऱण्यात आला होता. या उद्यानामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. अनेक पालक आपल्या मुलांना  येथे खेळण्यासाठी घेवून येत होते. बसण्यासाठी केलेल्या सोयीमुळे अनेक जेष्ठ नागरिक या उद्यानात येऊन सुंदर वातावरणात फेरफटका मारत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून उद्यानातील गैरसोय बघून या उद्यानाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी हे उद्यान आता जुगाराचा अड्डा झाला असून, नशेखोरांनीही या उद्यानात आपले बस्थान बांधले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

“या उद्यानाला पुनर्जीवित केले तर येथील स्थानिकांना या उद्यानाचा वापर करता येईल तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा पुन्हा मिळेल. त्यामुळे मी पालिकेला पत्रव्यवहार करत सतत पाठपुरावा करत आहे. मात्र पालिका माझ्या वारंवार पाठ्पुराव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पलिका प्रशासन या याबाबत गंभीर नसून, आमच्या या मागणीकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करत आहेत, असे आवर्तन पवईशी बोलताना कांबळे यांनी सांगितले.

पालिकेने लवकरात लवकर या उद्यानाची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांकडून देण्यात आला आहे.

“सदर उद्यानात पाण्याची स्टोरेज टाकी असल्याने आमच्या निरीक्षका मार्फत उद्यानाची सर्व पाहणी कऱण्यात आली आहे. नव्याने उद्यान उभारणीसाठी निधीही उपलब्ध केला असून, पालिका उद्यान विभागाकडून लवकरच या उद्यानाचे नव्याने काम सुरू करून लहान मुलांसाठी खेळण्याची सर्व साधने देखील नव्याने बसवण्यात येणार आहेत”, असे सहाय्यक अधीक्षक उद्यान विभाग यांनी सांगितले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!