पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून देणाऱ्या पतीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. शिवप्रसाद साहबलाल यादव असे आरोपी पतीचे नाव असून, नवविवाहित जोडपे पवईतील तुंगा गावात राहत होते. गंभीररित्या भाजल्याने उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आहे. आरोपी पती सातत्याने हुंड्याची मागणी करीत असल्याचेही या घटनेनंतर समोर आले आहे.
याबाबत पवई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तरप्रदेशचे असणाऱ्या या जोडप्याचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. दोघे तुंगा गाव येथे एका खोलीत राहत होते. लग्नाच्या काही दिवसातच पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण सुरु केली होती. तो तिच्याकडे तिच्या माहेरच्या माणसांकडून हुंडा मागून घेण्याची मागणी सुद्धा करत असे. ज्यामुळे लग्नानंतर काही महिन्यांत त्यांचा संसाराचा डोलारा विस्कटला होता.
संशयाच्या आणि हव्यासाने पछाडलेल्या पतीचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संयम ढळला. घरात पती आणि पत्नी दोघेच असताना रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले, ज्यामध्ये तोही भाजला गेला. स्थानिकांनी सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत पीडिता बरीच भाजली गेली होती. तिला सुरुवातीला कपूर आणि नंतर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे मृत्यशी लढा देताना जवळपास ९०% भाजले गेले असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पवई पोलिसांनी पीडिताचा रुग्णालयात नोंदवलेल्या जवाबात सुरुवातीला तिने पतीचा दोष नसून, स्टोव्हच्या भडक्यामुळे पेटली असल्याचे सांगितले होते. मात्र, पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपी संशय व्यक्त करत पुन्हा जवाब नोंदवण्याची मागणी पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी नोंदवलेल्या जवाबात तिने पती आपल्याकडे बाईकसाठी माहेरी पैशाची मागणी करण्याचा तगादा लावत होता. आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन शाररिक आणि मानसिक छळ करत असल्याचा जवाब देत घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर पवई पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
No comments yet.