मुलांच्या समस्येसाठी पालकांना व मुलांना हेल्पलाईनच्या माध्यमातून करणार समुपदेशन
धावपळीच्या जीवनात अनेक पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास वेळच नसतो, त्यामुळे हळू हळू मुले आपल्याच विश्वात रमतात. जसे जसे ते मोठे होऊ लागतात तश्या पालकांच्या माझा मुलगा माझे ऐकत नाही, अभ्यास करत नाही, व्यवस्थित खातपित नाही, उलटे बोलतो, मारामारी करतो अशा एक ना अनेक तक्रारी सुरु होतात. या प्रकारच्या समस्यांना तोंड कसे द्यावे हे बऱ्याच वेळा पालकांना समजत नाही. परिणामस्वरूप पालक आणि मुलांमध्ये हळू हळू दुरावा निर्माण होतो. पण पालकांना आता घाबरण्याची मुळीच गरज नाही, कारण ‘परिसर आशा’ ही संस्था मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना मदत करण्यास पुढे आली आहे.
संस्थेच्यावतीने ‘पॅरेंट हेल्पलाईन’ सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत ‘परिसर आशा’चे तज्ञ २ ते १४ वर्षाच्या मुलांच्या पालकांना त्यांचे संगोपन आणि तक्रारीवर मोफत मार्गदर्शन करणार आहेत. पालक आपल्या समस्या फोनद्वारे अथवा ईमेलद्वारे संस्थेला पाठवू शकतात. पालकांचे नाव गुप्त ठेवत असल्याने पालक निर्धास्तपणे आपली समस्या मांडू शकतात, असे माध्यमांशी बोलताना संस्थेच्या संचालिका आरती सवूर यांनी सांगितले.
मानवी जडणघडणीत बालसंगोपन महत्वाचे आहे. कौटुंबिक, सामाजिक, शालेय परिसराचा मुलांच्या विकासावर परिणाम होत असतो. सध्याच्या धावपळीच्या काळात आई-वडील दोघेही नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असल्याने मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी मुलांच्या जडणघडणीवर याचा परिणाम होतो आहे आणि त्यामुळे मुलांच्या अनेक समस्यांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र अशा पालकांना परिसर आशा या संस्थेने मदतीचा हात पुढे केल्याने एक दिलासा मिळाला आहे.
कै. ग्लोरिया डिसुझा या शिक्षेकेने चालू केलेली परिसर आशा संस्था गेली ३२ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. ही संस्था आज ८०० पेक्षा अधिक सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षणाचा प्रचार करत आहे. शिक्षक हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असल्याने शिक्षकाचे कार्य फक्त शिक्षण देण्यापुरतेच मर्यादित नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून देशाचा भावी नागरिक तयार करणे हा आहे. यासाठी या संस्थेने १०,००० पेक्षा जास्त शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.
“हेल्पलाईनद्वारे पालकांना आपल्या समस्या मांडता येत असून, त्यांच्याबद्दलची सर्व माहिती गुप्त ठेवत असल्याने तसेच मोफत समुपदेशन केले जात असल्याने पालकांनी न घाबरता आपल्या समस्या मांडाव्यात”, असे आवाहन संस्थेच्या संचालिका सवूर यांनी केले आहे.
आपण या संस्थेच्या हेल्पलाईन ८८२८२३३४४३, (+९१-२२) २६१२ ४४४२, [email protected] येथे संपर्क साधू शकता
No comments yet.