बस थांब्यावर बसची वाट बघत उभ्या असणाऱ्यापैकी एकाला चिरडून बस निघून गेल्याची घटना सोमवारी सकाळी पवईतील रामबाग येथे घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सदर बसचा तपास सुरु केला आहे.
चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात राहणारे शुभम शंकर वाघ (२९) हे सकाळी अंधेरी सिप्झ येथे आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते. तिकडे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी सकाळी ७.५० वाजता ते रामबाग येथील पुढील बस थांब्यावर उभे होते. “याचवेळी सकाळी गांधीनगरकडून जोगेश्वरीच्या दिशेने सकाळी भरधाव वेगात जाणाऱ्या एका बस चालकाचा ताबा सुटल्याने, रामबाग फ्लायओव्हरवर आदळणाऱ्या बसवर कसेबसे नियंत्रण मिळवण्याच्या नादात बस बाजूलाच बसथांब्याच्या दिशेने आली आणि येथे उभे असणाऱ्या वाघ यांना चिरडत तशीच भरधाव निघून गेली” असे प्रत्येक्षदर्शिनी पोलीस जवाबात सांगितले.
माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमीला राजावाडी रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
“आम्ही परिसरात उपलब्ध असणारे सर्व सिसिटीव्ही तपासून पहिले, मात्र झाडी आणि त्याचवेळी येणाऱ्या जाणाऱ्या अनेक बसेसमुळे नक्की बस कोणती होती हे समजू शकले नाहीे. यावेळी धावणाऱ्या सर्व बसेसची माहिती मिळवून आमचा सदर बसचालकाचा शोध सुरु आहे” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.